१५ हून अधिक दुकाने जळून खाक
। नाशिक । प्रतिनिधी ।
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भंगार दुकानाच्या गोदामाला शुक्रवारी (दि. 21) दुपारी आग लागली. या आगीत 15 हून अधिक दुकाने जळून खाक झाली.
पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर भंगाराची दुकाने आणि गोदामे आहेत. शुक्रवारी एका दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यातच शॉर्टसर्किटही झाले. त्यामुळे भंगार गोदामातील कागद, प्लास्टिक, लाकूड, रबर यासह वेगवेगळ्या सामानाने पेट घेतला. दुकानाच्या रांगेत कांद्याचे गोदाम असल्याने त्यानेही पेट घेतला. आग इतर दुकानांपर्यंतही पोहचली. पिंपळगाव बसवंत, ओझर, दिंडोरी, निफाड या ठिकाणाहून अग्निशमन बंब दाखल झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत सर्वच व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.