स्मशानभूमीशेजारी डम्पिंग ग्राउंड

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेलू येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या शेजारीच ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंड उभारल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले असून, काही ठिकाणी कचरा जाळला जात असल्याने दुर्गंधी, धूर आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असून, परिसरात प्लास्टिक, इतर घनकचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे या पवित्र जागेची प्रतिष्ठा धोक्यात आल्याची भावना बौद्ध समाजातून व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मशानभूमीच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड असल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. जवळच पाण्याचा स्रोत असल्याने कचऱ्यामुळे जलप्रदूषण होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशी यांनी शेलू ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्मशानभूमीशेजारील हा कचरा नेमका हटणार कधी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, बौद्ध समाजासह स्थानिक नागरिकांनी शेलू ग्रामपंचायत प्रशासक, पंचायत समिती कर्जत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणची पाहणी करून डम्पिंग ग्राउंड अन्यत्र स्थलांतरित करावे, स्मशानभूमी परिसर स्वच्छ करावा आणि भविष्यात अशा प्रकारे कचरा टाकण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version