ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर जलसंकट

। नवी मुंबई । वृत्तसंस्था ।

कोकणपट्टीत पावसाला सुरुवात झालेली असतानाच नवी मुंबईकरांवर मोठ्या पाणीकपातीचे संकट कोसळले आहे. आता नव्या निर्णयानुसार नवी मुंबईतील प्रत्येक विभागात आठवड्यातील तीन दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईकरांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मोरबेच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने महापालिका प्रशासनाने पाणीकपात आणखी मोठी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा होईपर्यंत बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि सिडको नोडमध्ये ही पाणीकपात शुक्रवारपासून (14 जून) लागू करण्यात आली आहे. यापूर्वी पावसाचे आगमन गृहित धरुन महापालिकेने 4 जूनपासून नोडप्रमाणे आठवड्यातून 2 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, मोरबे धरणातील साठ्यात होत असलेली घट आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने आता आठवड्यातून 3 दिवस नोडनिहाय पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ नवी मुंबई महापालिकेवर आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरण परिसरात पाऊस अत्यल्प पडला आहे. त्यातच उष्णतेमुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट होत असल्याने नवी मुंबईकरांची आणि महापालिकेची चिंता वाढली आहे. आता पावसाने दडी मारली किंवा पुरेशा प्रमाणात पडला नाही तर आणखी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून महापालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Exit mobile version