मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य

| रोहा | वार्ताहर |

गणेशोत्सवानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामामुळे महामार्गावर सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कोलाड बाजारपेठ ते तळवली गावापर्यंत अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने या धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पाण्याची फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे मात्र रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातून मार्ग काढताना दुचाकी वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 17 वर्षांपासून सुरू आहे. गणेशोत्सवानंतर या महामार्गाचे काम शीघ्रगतीने सुरू असले तरी या कामात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडपासून खांबपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, उड्डाण पूल, छोटे-मोठे ब्रिज, गटाराचे काम विविध ठिकाणी सुरू आहे. असे असताना हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, याची खात्री देता येत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. कोलाड बाजारपेठेत, तसेच तळवली येथील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे प्रवासीवर्गाबरोबर स्थानिक व्यापारी व नागरिक बेजार झाले आहेत. तुफान वेगाने ये-जा करणार्‍या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात आहे, परंतु या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तसेच दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे हजारो लीटर पाणीदेखील वाया जात आहे. शिवाय दुचाकींचे अपघातदेखील होत आहेत. त्यामुळे योग्य नियोजनानुसार या धुळीवर उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version