| सुधागड -पाली | वार्ताहर |
पाली शहरात सर्वत्र धुळीचे लोट वाहत आहेत. त्यामुळे पाली शहराची ओळख धुळीचे शहर म्हणून होत आहे .या धुळीकडे नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शहरात प्रदूषित हवेमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रदूषणामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येने श्वसनक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार, अॅलर्जी, खोकला, कफ, धाप, सर्दी, घशात दुखणे अशा त्रासास सामोरे जात आहेत. या धुलीकणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसन क्षमता कमी होत आहे. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत. हवेतील धुळीचे प्रमाण सरासरीपेक्षा वाढल्याने नागरिकांना श्वसन विकारांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील खराब रस्ते, शहरात कासवाच्या गतीने सुरू असले रस्ता बांधकाम, शहरातून ओव्हरलोड वाहतूकीवर पोलिस अधिकारी, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचा आरोप नागरीकातून होत आहे. त्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबद्दल नागरीकातून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीने लक्ष द्यावे
शहरात धुळीच्या साम्राज्यामुळे जेष्ठ नागरिकांना श्वसनाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच लहान बालकांना धुळीची ऍलर्जी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे नगरपंचायतने लक्ष देवून पाण्याची फवारणी करावी अशी मागणी जोर धरत यांनी आहे.
पाली शहरातील जे रस्त्याचे काम चालू आहे. ते समृद्धी महामार्गपेक्षाही चांगल्या दर्जाचे असून कामाला एवढी गती आहे. की लोकांना कमीत कमी दहा वर्ष तरी वाट पाहावी लागणार आहे.पालीतील गतिशील व दर्जेदार कामाबाबत ठेकेदार व नगरपंचायती सत्काराचा कार्यक्रम लवकरच घेतला जाणार आहे. – अॅड.नरेश शिंदे