| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील दस्तुरी येथील ई-रिक्षा स्टँड रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले स्टॉल्स शहराचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी उचलून टाकले होते. मात्र, त्यांना आता घरचाच आहेर मिळाला आहे. दरम्यान, त्या ठिकाणी पुन्हा स्टॉल्स लागले असून, व्यवसाय करणारे प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र दस्तुरी नाका येथे पहायला मिळत आहे.
पर्यटक दस्तुरी नाका येथे आपले वाहन पार्किंग करून माथेरान शहरात प्रवेश करीत असतात. शहरात प्रवेश करीत असताना काही मिनिटांवर पर्यावरणपुरक ई-रिक्षांचा स्टँड आहे. या स्टँडच्या आवारात खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार व्यवसाय करणाऱ्यांनी व्यापले असल्याने माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी त्या सर्व दुकानांवर स्वच्छतेच्या नावाखाली ॲक्शन घेत त्यांच्यांकडून हे सर्व स्टॉल येथून हटवण्यात आले होते. मात्र, हे स्टॉल हटवून तीन ते चार दिवस झाले नाही तर पुन्हा एकदा या ठिकाणी हटविण्यात आलेले स्टॉल पुन्हा उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता माथेरान नगरपरिषद यावर लक्ष देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचवेळी नगरपरिषदेचे अधिकारी याच रस्त्याने शहरात जात असतात, त्यांना ते अनधिकृत स्टॉल दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मुख्याधिकारी कोणाच्या दबावाखाली राहून पुढाकार घेत नाहीत? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.
माथेरानच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर
