अश्वपालक फिरु लागले पार्किंगमध्ये; माथेरान बचाव समितीचा संताप
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात 18 मार्चपासून पर्यटन व्यवसाय बंद करण्यात आल्यानंतर 19 मार्च रोजी प्रशासनाने बैठक घेऊन मार्ग काढला होता. त्यावेळी आमदारांनी दोन्ही बाजूंचे नुकसान होणार नाही अशी भूमिका घेतल्यावर माथेरान पर्यटन बचाव समितीने माथेरान बंदचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, मंगळवारी आ. महेंद्र थोरवे माथेरानमध्ये पुन्हा आले आणि त्यांनी दस्तुरी येथील पार्किंगमध्ये पाच अश्वपालक यांना जाण्याची मुभा दिली. दरम्यान, माथेरान बचाव समितीने शासनाच्या अधिकार्यांना धारेवर धरून रीतसर अजेंडा काढून झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे कार्यवाही सुरू असताना नवीन निर्णय कोणत्या अधिकारात लागू केले, असे अनेक प्रश्न उपस्थित करून केले. दरम्यान माथेरान बचाव समिती अशा बदललेल्या निर्णयाने संतप्त आणि आक्रमक असून, पुन्हा माथेरान बंद करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.
माथेरान शहर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद पर्यटन जगतात उमटले होते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून माथेरान बंदबाबत चर्चा सुरू होती आणि त्यानंतर मार्चचे मध्यास माथेरान बंद ठेवण्यात आले. त्याचा थेट परिणाम माथेरानमधील पर्यटन व्यवसायावर झाला असून सध्या माथेरान शहरात पर्यटकांचा शुकशुकाट दिसून येत आहे. त्यात 19 मार्च रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाने बैठक घेतली. त्यात अनेक महत्वाचे निर्णय झाले होते आणि त्या बैठकीच्या इतिवृतानुसार प्रशासनाने निर्णयांची अंमलबजावणी आणि कार्यवाही सुरू केली होती. त्यातील महत्त्वाच्या निर्णयानुसार दस्तुरी नाका येथे अश्वपालक हे तेथील चेडोबा मंदिर येथे थांबून व्यवसाय करू लागले होते. मात्र, त्या नवीन ठिकाणी आमचे घोडे यांना पर्यटक मिळत नसल्याने सर्व घोडे मालक यांनी नेरळ येथील कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. त्यानंतर आमदार थोरवे हे दस्तुरी येथे आले आणि त्यांनी प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून प्रत्यक्ष जागा निश्चित करून काही बदल सुचवले. त्यात सध्याच्या ई रिक्षा स्टँड येथे घोडा स्टँड तर त्यापुढे हात रिक्षा स्टँड आणि शेवटी ई रिक्षा स्टँड असे निर्णय आमदारांनी घेतले. त्यावेळी प्रशासनाचे वतीने महसूल अधीक्षक सुरेंनसिंह ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे,पोलीस अधिकारी अनिल सोनोने आणि वन अधिकारी उमेश जंगम हे उपस्थित होते.
प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यावर घोडा ही माथेरान संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अश्वपालक यांचे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पार्किंगमध्ये प्रत्येकी पाच घोडेस्वार यांना पर्यटकांना माहिती देण्यासाठी जाण्याची मुभा देण्यात आली. मात्र, या बैठकीनंतर माथेरान शहरात पोहोचलेले महसूल अधीक्षक, पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडे माथेरान बचाव समितीचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी अधिकृत बैठकीत ठरलेला निर्णय बदलताना माथेरान पर्यटन बचाव समितीची भूमिका समजून न घेता कशासाठी निर्णय घेतला अशी मागणी केली. त्याचवेळी समितीच्या अनेक नेत्यांनी कोणत्याही प्रकारचा अजेंडा नसलेला बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. तर दुसरीकडे दस्तुरी येथील पार्किंगमध्ये पुन्हा घोडेवाले फिरू लागल्याने माथेरान बंदचा परिणाम शून्य दिसून येत असल्याने माथेरान पर्यटन बचाव समिती आक्रमक झाली आहे. घोडे नवीन जागेत उभे करून देण्यास आणि त्या ठिकाणी असलेले ई रिक्षा स्टँड हलवण्यास देखील माथेरान पर्यटन बचाव समितीने कडाडून विरोध केला आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचे प्रशासनाचे काम असेल तर त्यांनी नवीन नियमांची अंमलबजावणी करून नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे. तसेच कोणत्याही स्थितीत ई रिक्षा स्टँड हलविला जाणार नाही असे श्रमिक हात रिक्षा संघटना यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे माथेरान मधील वातावरण पुन्हा तापले असून माथेरान पर्यटन बचाव समिती माथेरान शहर बंद ठेवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.