लायन्स क्लब अलिबागचा स्तुत्य उपक्रम
| रायगड | प्रतिनिधी |
लायन्स क्लब अलिबाग या संस्थेने पर्यावरण आठवडा अंतर्गत अलिबाग नगरपालिकेचा सहकाऱ्याने ई – कचरा संकलनाचे काम हाती घेतले होते. ई – कचरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा ही आज पर्यावरणासाठी फार मोठी समस्या असून, भारत ई – कचरा निर्मितीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याबाबत जागरूकता निर्माण करणे, त्याचे संकलन करणे आणि योग्य विल्हेवाट लावणे फार गरजेचे आहे. दिनांक 19 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान लायन्स क्लबच्या माध्यमातून अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी शहरातील नागरिक आणि क्लब सदस्याना ई – कचरा जमा करण्याचे आवाहन केले होते. याला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला.
जमा झालेल्या ई – कचऱ्यापैकी 1150 किलो ई -कचरा पुढील प्रक्रियेकरिता रवाना करण्यात आला. लायन अनिल आगाशे यांनी या उपक्रमाची जबाबदारी उचलली होती. त्यांना लायन महेंद्र पाटील, संतोष पाटील, महेश कवळे, संजय माळी, विकास घरत, अभिजित आमले, नयन कवळे यांनी सहकार्य केले. लायन्स क्लब अलिबागच्या सर्वच सदस्यांनी या ई – कचरा निर्मूलन उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
अलिबाग नगरपालिका नगराध्यक्ष अक्षया नाईक, उपानगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रशांत नाईक, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी साळुंखे यांचे सुद्धा या कामी सहकार्य मिळाले. लायन्स क्लब अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी ही मोहीम पुढील काही दिवस चालूच राहील आणि ई – कचरा हे पर्यावरणासाठी फार मोठे आव्हान असून लायन्स क्लब आणि नगरपालिकेचे माध्यमातून किमान तीन टन ई – कचरा गोळा करून त्यावर पुढील योग्य प्रक्रिया करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.







