कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन; कर्जतमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू
| नेरळ | प्रतिनिधी |
कोकणात खरीप हंगामाची चाहूल लागताच बाजारपेठेत बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मोठी उलाढाल सुरू होते. मात्र, घाईघाईत किंवा केवळ स्वस्त मिळते म्हणून अनधिकृत विक्रेत्यांकडून शेती साहित्य खरेदी केल्यास शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. दर्जेदार पिकाची हमी मिळवण्यासाठी खरेदी करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कर्जत कृषी अधिकारी दिनेशकुमार कोळी यांनी केले.
भात आणि इतर बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोकण आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. दर्जेदार उत्पादनाची सुरुवात ही दर्जेदार बियाण्यापासून होते. अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करताना बियाणे नेहमी कृषी विभागाचा परवाना असलेल्या मान्यताप्राप्त दुकानातूनच खरेदी करा. रस्त्यावरील विक्रेते किंवा घरपोच बियाणे देणाऱ्या अनधिकृत व्यक्तींकडून खरेदी टाळा. पॅकिंगची तपासणी करताना बियाण्याचे पाकीट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करा, असे आवाहन केले. प्रमाणित टॅग पाहणी करून बियाण्यांच्या पिशवीवर निळ्या रंगाचा (प्रमाणित बियाणे) किंवा पांढऱ्या रंगाचा (पायाभूत बियाणे) टॅग आहे का? याची तपासणी करा. त्यावर बियाण्याचा प्रकार, वाण आणि लॉट नंबर असणे अनिवार्य आहे.
बियाण्याची उगवण क्षमता किती तारखेपर्यंत आहे, हे तपासूनच खरेदी करा तसेच मुदत संपलेले बियाणे पेरल्यास उगवण होत नाही. बियाण्याची पिशवी जपून ठेवा, पेरणी झाल्यानंतर बियाण्याची रिकामी पिशवी आणि त्यावरील टॅग पीक कापणीपर्यंत जपून ठेवावा. तक्रार उद्भवल्यास हे पुरावे म्हणून कामी येतात. रासायनिक खते खरेदी करताना सतर्कता ठेवून खतांच्या टंचाईचा फायदा घेऊन काही वेळा भेसळयुक्त खते बाजारात येऊ शकतात. खतांच्या गोणीवर छापलेल्या छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नका. खतांचे दर सरकारने निश्चित केलेले असतात. वजन तपासून घ्या आणि गोणीचे सील व्यवस्थित आहे का आणि वजन बरोबर आहे का, याची खात्री करा. नॅनो युरियाचा वापर करताना पारंपारिक युरियासोबतच आता नॅनो युरियाचा वापर वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. खतांची साठवणूक करताना खरेदी केलेली खते ओलसर ठिकाणी ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदीचे नियम पाळावेत आणि कीटकनाशके ही घातक रसायने असल्याने त्यांची खरेदी आणि हाताळणी अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ केंद्रीय कीटकनाशक मंडळाने मान्यता दिलेलीच कीटकनाशके खरेदी करावीत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिनेश कोळी यांनी केले आहे.







