खेकडा शेतीतून लाखोंची कमाई

पेझारी येथील तरुणांनी खेकडा शेतीचा उभारला प्रकल्प
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मत्स्य व्यवसायाचा खर्च जास्त तर मिळणारा भाव कमी. सततच्या होणार्‍या नुकसानाला वैतागून रायगडच्या पेझारी येथील तरुणांनी खेकडा शेतीचा यशस्वी प्रयोग केला. आज त्यांनी उत्पादित केलेल्या खेकड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. मत्स्यशेतीचा खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा भाव कमी यामुळे वैभव धुमाळ व धनंजय धुमाळ हे दोन्ही भाऊ चिंतेत होते. यावर पर्याय काय यावर त्यांनी विचार सुरु केला. लगतच खाडी असल्याने खाडीतील पाणी तलावात घेऊन खेकडा शेती करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. खेकडा शेतीचा अभ्यास करत त्यांनी प्रत्यक्ष हा प्रकल्प उभा केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असणार्‍या पेझारी या गावात त्यांनी खेकड्याची तीन प्रकारची शेती केली आहे.



स्वजातीय भक्षता हा खेकड्यांचा मोठा अवगुण आहे. मोठा खेकडा लहान खेकड्याला खातो. त्यामुळे खेकडे एकत्रित ठेवले तर त्यांची मोठ्या प्रमाणात मर होते. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून तलावावर तरंगते बॉक्स ठेवून त्यामध्ये मर्यादित खेकडे ठेवण्याची पद्धत त्यांनी वापरली. यातून उत्पादित होणार्‍या खेकड्यांची मागणी परदेशातदेखील होत आहे. पूर्वी निसर्गतः खाडीमधून मुबलक प्रमाणात खेकडे मिळत होते. विविध कारणांनी हे प्रमाण आता कमी झाले आहे. परंतु खेकड्यांची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने शेतकर्‍यांना यामध्ये मोठा नफा मिळतो. त्यामुळे तरुणांना खेकडा शेती हे उत्पन्नाचे चांगले साधन ठरू शकते.

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून खेकड्यांकडे पाहिले जाते. सांधेदुखी, रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांना डॉक्टर खेकडे खाण्याचा सल्ला देतात. खेकड्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे खेकड्यांना देश तसेच विदेशातूनदेखील मोठी मागणी आहे. कष्ट करण्याची तयारी असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी खेकडा शेती हा व्यवसायाचा चांगला मार्ग ठरू शकतो. हे या दोन तरुण शेतकर्‍यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेय.

Exit mobile version