कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

| सातारा | प्रतिनिधी |

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळेत भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसले. या भूकंपांची तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केलदरम्यान असल्याने धक्के नागरिकांना जाणवले नाहीत. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका निर्माण झालेला नसून, परिसरात कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. मध्यरात्री साडेबारा वाजता 2.1 रिश्टर स्केलचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दीड वाजता 2.3, सव्वा तीनला 2.2, पंधरा मिनिटांनी 2.5 आणि पहाटे चार वाजता 2.1 रिश्टर स्केलचा धक्का बसला. या भूकंपांचे केंद्र साताऱ्यापासून सुमारे 50 ते 52 किलोमीटर अंतरावर होते. दरम्यान, कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्र सध्या बंद असल्याने भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अचूक अंतर, खोली तसेच अक्षांश-रेखांशाची नोंद होऊ शकली नाही. कोयना परिसर भूकंपप्रवण क्षेत्र असून, येथे यापूर्वीही लहान-मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सध्या परिस्थिती सामान्य असल्याची माहिती देण्यात आली.

Exit mobile version