भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध सोपा विजय

मालिकेत 2-1 अशी आघाडी

| हरारे | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध हरारेला झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 23 धावांनी सोपा विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 षटकात 6 बाद 159 धावा केल्या.

झिम्बाब्वेची सुरुवातच खराब झाली होती. त्यांनी अवघ्या 39 धावांत 5 गडी गमावले होते. यात कर्णधार सिकंदर रझाचाही समावेश होतो. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील डियॉन मेयर्सला यष्टीरक्षक फलंदाज क्लाईव्ह मदांडेची साथ मिळाली. त्यांनी 77 धावांची भागीदारी करत झिम्बाब्वेच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, अखेर 17 व्या षटकात मदांडेला वॉशिंग्टन सुंदरने 37 धावांवर बाद केले. यानंतर झिम्बाब्वेला विजय मिळवणं कठीण गेलं. दरम्यान, मेयर्सने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. त्याने 49 चेंडूत 65 धावांची खेळी केली, ज्यात 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच, वेलिंग्टन मसकादझा 18 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 4 षटकात 15 धावाच खर्च करत 3 बळी घेतले. तसेच, आवेश खानने 4 षटकात 39 धावा खर्च करताना 2 बळी घेतले, तर खलील अहमदने 1 बळी घेतला.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी केली करत 67 धावांची भागीदारी केली. पण जयस्वाल 36 धावांवर बाद झाला. अभिषेक शर्माही 10 धावांवर स्वस्तात बाद झाला. मात्र, गिलने आपली लय कायम ठेवली आणि ऋतुराज गायकवाडबरोबर 72 धावांची भागीदारी केली. गिलने या दरम्यान 66 धावा केल्या. तसेच, ऋतुराजने 28 चेंडूत 49 धावा केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 4 बाद 182 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

गिलचे खणखणीत अर्धशतक
या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला जवळपास 10 च्या धावगतीने धावा जमवल्या होत्या. महत्वाचे खेळाडू जयस्वाल त्यानंतर अभिषेक शर्मा बाद झाल्या नंतर पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला या सामन्यात सूर सापडला. गिलजे ऋतुराज गायकवाडला साथीला घेत आक्रमक खेळी करत 72 धावांची भागादारी केली. गिलने यादरम्यान त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. गिलने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
Exit mobile version