महामार्गावर इको कारचा अपघात; एकाचा मृत्यू

| नागोठणे । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्फे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे अनेकांना आपले जीव देखील गमवावा लागले आहेत. त्यातच नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकण नाक्यावर मौजे पाटणसई गावच्या हद्दीत (दि.20) पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मारुती सुझुकी कंपनीची इको कार रस्त्याच्या कडेने खाली जात पलटी झाली. या अपघातात इको कारमधून प्रवास करणारे नरेश रामचंद्र भिसे (वय 48, रा. बामणोली- देवरुख, सध्या रा. मनवेलपाडा- विरार) मृत्यू झाला.

नागोठणे पोलीसांकडून या अपघाता संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विशाल दिपक बेटकर (वय 23, रा. विलेपार्ले- मुंबई) हा आपल्या ताब्यातील इको कार माणगाव बाजूकडून वडखळ बाजूकडे अतिवेगाने तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवीत घेऊन जात असताना मौजे पाटणसई गावच्या हद्दीत आले असता खड्ड्यांतून मार्ग काढत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी होऊन झालेल्या या अपघातात नरेश रामचंद्र भिसे यांना गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी अपघातस्थळी जात पाहणी केली. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून महिला पो.ना. ज्योती भोईर ह्या अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version