विद्यार्थ्यांनी पालकांसह लावली झाडे
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील उपक्रमशील समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा म्हणून झुगरेवाडी शाळा समजली जाते. या झुगरे वाडी शाळेत पर्यावरण पूरक प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत आहे, कर्जतमधील तापमान कधी नव्हे ते चाळीशी पार झाले आहे. या गोष्टींचा विचार करून रायगड जिल्हा परिषदेच्या झुगरेवाडी शाळेत पर्यावरण संवर्धन करणेसाठी ऑक्सिजन आणि सावली देणारी वडाच्या 20 झाडांची लागवड पालक आणि विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचवेळी शाळेत कार्यरत असणाऱ्या पर्यावरण क्लबच्या माध्यमातून या झाडाच्या संवर्धनासाठी लक्ष दिले जाणार आहे. लहान वयात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे सोपे जावे, असा उद्देश पर्यावरण क्लबचा आहे.
शाळेत पहिले पाऊल ठेवत असताना विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाणीव व्हावी यासाठी त्यांच्या हस्ते तसेच त्यांच्या पालकांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेवून दाखल झालेल्या 20 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या हस्ते 20 वड संवर्गातील झाडांची लागवड करण्यात आली. त्याचवेळी लावण्यात आलेल्या झाडांची जोपासना करण्यासाठी प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी आणि पालक यांना देण्यात आली. ही रोपे पालकांनी आपल्या घराच्या अंगणात, आवारात आणि शेताच्या बांधावर लावून त्यांची जोपासना केली जाणार आहे.
