पर्यावरणपूरक गणेश सजावट मखर विक्रीसाठी तयार

मिणमिने कुटुंबाची दोन महिन्यांपासून तयारी

| नेरळ | प्रतिनिधी |

थर्माकोल बंद झाल्यानंतर सर्वत्र पर्यावरण पूरक सजावटी तयार करण्यास सुरुवात झाली.आता तर कागदापासून तसेच बांबूच्या काठ्यांपासून आकर्षक मखर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात कर्जत तालुक्यातील अंजप गावातील मिणमिने कुटुंबाने आपला छंद जोपसण्यासाठी बांबूच्या काठ्यांपासून मखर बनविण्यास सुरुवात केली असून, आज पाच वर्षांपासून आपल्या आवडत्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले आहे.

गणेशोत्सव 17 सप्टेंबरपासून असल्याने शेतीची कामे उरकल्यावर मिणमिने कुटुंबाकडून पर्यावरणपूरक मखर बनविण्यास सुरुवात झाली. गेली दीड महिना हरिचंद्र मिणमिने हे पत्नी भारती आणि मुलगे राज, आदित्य यांच्या मदतीने पर्यावरणपूरक मखर बनवत आहेत. त्यात हरिचंद्र मिनमिने आपली नोकरी सांभाळून मखर बनविण्याचे काम करता. त्यांनी आतापर्यंत 40 मखर बनवून तयार केली आहेत. मागील काही वर्षात त्यांच्या मखरांना कल्याण, डोंबिवली, कर्जत तालुका तसेच बलादपूर आदी भागातून मागणी वाढत आहे. साडे तीन ते सहा फूट आकाराचे मखर मिणमिने कुटुंबियांनी साकारल्या आहेत.

पर्यावरणपूरक मखर
सिंहासन, डबल मजली वाडा, मंदिर, खेकडा आदी साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक मखर असल्याने या मखरांना गणेशभक्त किमान दोन-तीन वर्षे वापरू शकतात.

प्रदूषण नाही..
संपूर्ण सजावट ही पर्यावरणपूरक असल्याने काही मिनिटात नष्टदेखील होऊ शकते.त्याचवेळी त्या मखराच्या साहित्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणारे साहित्य नाही.

Exit mobile version