ईडी सरकारने तटकरेंसह मविआच्या 15 नेत्यांचे पोलीस संरक्षण तडकाफडकी काढले

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

राज्यातल्या ईडी सरकारने रडीचा डाव खेळत महाविकास आघाडीच्या किमान 15 नेत्यांचे पोलीस संरक्षण रातोरात काढून घेतले आहे. यामध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी खासदार कलाबेन डेलकर यांचाही समावेश आहे.

पोलीस संरक्षण काढून घेतलेल्या नेत्यांमध्ये युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार कलाबेन डेलकर यांचा समावेश आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत तरीही त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची संपर्क साधला असता ते म्हणाले की, नव्या सरकारने माझे संरक्षण यापूर्वीच काढले आहे. माझे संरक्षण काढल्यानंतरच माझ्या घरावर हल्ला झाला होता. घरावर हल्ला झाल्यानंतरही मला पोलीस संरक्षण दिलेले नाही. आताही मला संरक्षण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर खा. सुनील तटकरे यांनी देखील आपले संरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगितले.

दरम्यान, एकीकडे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपने राज्यात लोकप्रतिनिधींना कारवाईच्या धमक्या देऊन नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या सरकारने महाविकास आघाडीच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचे काम केले होते. आता पोलीस संरक्षण काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version