मुंबईत ईडीची छापेमारी; दाऊदसंबंधित व्यक्तींवर कारवाई

| मुंबई | वृत्तसंस्था |
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तांच्या झालेल्या कराराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईतील 10 ते 12 छापेमारी केली. इतकेच नाही तर, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे, याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ही व्यक्ती कोण आणि ईडीने नक्की कोणत्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. परंतु, कारवाईच्या फेर्‍यात आलेल्या व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी राष्ट्रीय तपासयंत्रणेने गेल्या आठवड्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएकडून संबंधित व्यक्तीच्या मालमत्तांवर छापे टाकले जात आहेत. त्यामुळे आता या सगळ्यातून केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दुबईला पळून गेलेल्या दाऊदचे मुंबईत अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये डी कंपनीचा सहभाग आढळून आला होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय तपास यंत्रणांनी 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबु बाकर याला यूएईमधून ताब्यात घेतले होते.

Exit mobile version