स्वबळाचे वारे आणि नारे

महाराष्ट्रात मान्सूनच्या निमित्ताने नैसर्गिक पावसाळी वारे वाहत असले तरी त्याच्या जोडीला राजकीय हवामान बदलत असल्यामुळे घोषणांचेही वारे वाहत आहे. त्यात अनेक प्रकार असले तरी त्यांच्यातला समान धागा म्हणजे स्वबळाच्या नार्‍याचे वारे. या नार्‍याला मोठी परंपरा आहे. विशेष करून महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकात आघाडी राजकारणाचे वैशिष्ट्य लाभल्याने असे नार्‍याचे वारे वाहण्यास वातावरण नेहमीच अनुकूल असते. त्यानुसार सध्या कधी नव्हे अशी महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकत्रित येण्यातून गेली दीड वर्षे चाललेली असताना सर्वप्रथम काँग्रेसने हे नारे दिले आणि आता ही आघाडी टिकते की नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आघाडी राजकारणाचे हेही वैशिष्ट्य असते की त्वरित या आघाडीमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या सुरू होतात. कोणत्याही मतभेदाला राजकीय सुरुंगाचे रूप दिले जाते. गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाणी माध्यमामुळे तेथे वस्तुस्थिती पेक्षा वक्त्यांचे व्यक्तिगत सादरीकरण अधिक प्रभावी ठरत असल्याने अतिशयोक्तपणाला मुक्त मैदान प्राप्त होते. त्यामुळे काँग्रेसने जेव्हा स्वबळाचा नारा लावला तेव्हा आघाडी टिकते की नाही अशी चर्चा सुरू झाली. परंतु त्याला स्फोटक पुरवठा केला तो शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून! प्रताप सरनाईक हे गेले अनेक दिवस किंबहुना महिने प्रसारमाध्यमांपासून लांब होते. कारण त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेला धरुन सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेने भारतीय जनता पार्टी बरोबर जुळवून घ्यावे जेणेकरून त्यांच्यासारख्या नेत्यांचा जो केंद्रीय यंत्रणांकडून छळ सुरू आहे तो कमी होईल किंवा दूर होईल. आपल्या पत्राला तार्किक, वैचारिक बैठक प्राप्त व्हावी आणि ते समर्थनीय व्हावे यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे लोक फोडत असल्याचे आरोप केले आहेत. कुठलाही नेता एका पक्षातून अन्य पक्षात जाणे हे जाहीर असते आणि ते लपून राहत नाही. त्यामुळे त्याबद्दलची वस्तुस्थिती तपासणे काही अवघड नाही. परंतु त्यांच्या या पत्रानंतर त्वरित भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आला आणि त्यांच्यातील काही उतावळ्या नेत्यांनी तर आता सेना-भाजप युतीचे सरकार येणार अशा प्रकारच्या वक्तव्याला प्रारंभ केला. भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असले तरी बहुमतासाठी शिवसेनेची गरज होती. परंतु यांच्यादरम्यान झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या गोपनीय कराराबाबत वाद होऊन भाजपा सत्तेपासून वंचित राहिला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून भाजपा हा सत्तेत येण्यासाठी आणि आघाडीत बिघाडी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असे स्पष्टपणे दिसते. हे पत्रप्रकरणही तेच आहे, यात वाद नाही. आता या पत्रावर विरोधी नेते देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात आणि किती अनुकूलता दाखवतात, याबद्दल कुतुहल होते. तथापि त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा विश्‍वास व्यक्त केला आणि हा प्रश्‍न शिवसेनेचा अंतर्गत असल्याचे सांगून अन्य नेत्यांप्रमाणे आपलेही तारु नार्‍याच्या सागरात झोकून दिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळाच्या घोषणा कधी करतात असा सवाल आहे. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, अशा घोषणा कुणीही करू शकतो परंतु त्यासाठी आधी आपली जमीन किती मजबूत आहे हे पहावे लागते. सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार हे या आघाडीच्या राजकारणाची सूत्रे हलवत आहेत आणि त्यांचे नेते असा कुठलाही आततायीपणा न करता उलट शिवसेनेबरोबर दीर्घकालीन आघाडी करण्याचे सूतोवाच करीत आहेत. त्यामुळे हे स्वबळाचे नारे केवळ मोसमी वारेच असते, परिस्थितीनुसार सगळे सत्तेसाठी आपआपल्या पायाखालची जमीन किती घट्ट आहे हे पाहून पवित्रा घेतात. सध्या तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये ते भान आहे असे वाटते. शिवसेनेचा पंगा थेट केंद्राशी आहे आणि राष्ट्रवादी सध्या केंद्राच्या लढाईत नवीन आघाडी करण्याच्या कार्यात गुंतलेला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात देशपातळीवर घडामोडी वेग घेतील आणि राज्याकडील गोष्टी मागे पडतील.

Exit mobile version