प्रश्‍न आहे 145 च्या मॅजिक फिगरचा!

जयंत माईणकर

लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कोणीही व्यक्त करू शकतो मात्र त्यासाठी 145 ची मॅजिक फिगर मिळवावीच लागते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वाक्यात महाराष्ट्राचं सध्याच राजकारण सामावलेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिलेला स्वबळाचा नारा आणि पाटोळेंनी व्यक्त केलेली मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा याच्या पार्श्‍वभूमीवर पवारांची प्रतिक्रिया होती.
आणि नानांच्या स्वबळाच्या नार्‍याला सामनाने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांची युती कायम राहील असं सांगून या वादात नवा रंग भरले आहे. उद्धव ठाकरेंनी तर स्वबळ हा आमचाही हक्क आहे असं सांगितलं. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी स्वबळ या विषयावर हायकमांड निर्णय घेईल असं सांगून वेळ मारून नेली. तर स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्र्यांनी हे शब्द काँग्रेसला उद्देशून नव्हे तर भाजपला उद्देशून म्हणत बाजू सावरुन घेतली.
जर भाजप आणि काँग्रेस हे स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढतील, असं म्हणत सामनानी पुढच्या नव्या राजकीय समिकरणाचं सूतोवाच करून ठेवलं आहे. पवार आणि ठाकरे या महाराष्ट्रातील दोन राजकीय घराण्यांचे नातेसंबंध आहेतच. याशिवाय पवारांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध असलेले शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष आहेतच.
पण राज्यातील निवडणुकांना साडेतीन वर्ष वेळ असताना आत्तापासून स्वबळाची भाषा करून काय साध्य होणार हा प्रश्‍नच आहे.
आज हे दोन पक्ष मिळून 113 आमदार आहेत. आणि भाजप, काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी युती असा तिरंगी सामना झाला तरीही हे दोन पक्ष मिळून 145 ची मॅजिक फिगर गाठतील याबाबत शंकाच आहे. अर्थात त्यांना सरकार स्थापन करायला काँग्रेसचीच गरज पडेल. पण या तिरंगी लढतीत कदाचित काँग्रेसलाच नुकसान सोसावे लागेल. कारण पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे तर मुंबई, ठाणे, मराठवाडा या भागात शिवसेनेचा. त्यामुळे ते एकमेकांना परस्पर पूरक ठरतात.
आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता स्वबळाचा नारा देत काँग्रेसनं अशी हारकिरी करणं अयोग्य आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीन पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत एकत्र लढतील अशी भूमिका घेतली होती आणि ते आजही या भूमिकेवर कायम आहेत. प्राप्त परिस्थितीत नाना पाटोळे आणि भाई जगताप यांनीसुद्धा सबुरीची भूमिका घेऊन स्वबळाचा नारा न देता महाविकास आघाडी म्हणून सर्व निवडणुकांना सामोरं गेल्यास भाजपचा पराभव निश्‍चित आहे आणि काँग्रेसचा यातच फायदा आहे.
अर्थात याची जाणीव ठाकरे, पवार या महाराष्ट्रातील दोन शक्तिशाली परिवारांनीसुद्धा ठेवली पाहिजे. हे दोन्ही परिवार आणि त्यांचे पक्ष अनेक वेळा एकत्र येऊन काँग्रेसला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. विधानसभेच्या अध्यक्षाची अद्याप निवड न होणे हाही या दोन परिवारांच्या अघोषित युतीचाच परिपाक मानला जातो. त्यामुळेही काँग्रेसची नेतेमंडळी शिवसेना, राष्ट्रवादीवर नाराज असतात.
पण हे एवढ्यावरच थांबत नाही. इन्फोर्समेंट डायरेकटोरेट चा फेरा मागे लागल्यानंतर त्रासलेले, मूळ राष्ट्रवादीचे आणि आता शिवसेनेचे कुठलंही पडणं मिळालेले ज्येष्ठ आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्राद्वारे राष्ट्रवादी शिवसेनेला कमजोर करत असून त्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेने भाजपचा हात धरणे योग्य असल्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यानंतर फक्त एक मीडिया हाऊसमध्ये आणि भाजप भक्तांंमध्ये पुन्हा शिवसेना भाजप युती अस्तित्वात येण्याच्या शक्यता रंगू लागल्या. दीड वर्षांपूर्वी, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या तीस वर्षे जुन्या मित्राचा हात सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर नवा घरोबा करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. पण इतक्यात काँग्रेसद्वारे स्वबळाचा नारा आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदाराद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर जाण्याचा सल्ला देणार पत्र पाहता महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसून बिघाडी सुरू असल्याचं दिसतं.
संपूर्ण बहुमताने महाराष्ट्रात अस्तित्वात आलेलं शेवटचं काँग्रेस सरकार म्हणजे 1985 साली स्व. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार. त्यावेळी काँग्रेसला 161 जागा मिळाल्या होत्या.
आकड्यांच्या इतिहासात 1990 पासून डोकावून पाहिलं तर त्या निवडणुकीपासून सत्तेवर येणारं प्रत्येक युती अथवा आघाडी सरकार अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या साह्यानेच अस्तित्वात आलं! अर्थात त्याला अपवाद होता 2014 आणि 2019 ला. 2014 चं सरकार केवळ दोन पक्षांच्या भरवशावर अस्तित्वात आलं होतं ज्यात भाजपचे 122 आणि शिवसेनेच्या 63 आमदार होते. तर 2019 चं महाविकास आघाडी सरकार चक्क तीन पक्षांच्या भरवशावर अस्तित्वात आलं. एकूणच 1995 पासून महाराष्ट्रात एकपक्षीय सरकारची सद्दी संपली आहे. शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस या सवत्या सुभ्याची स्थापना केली आणि निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधींवर त्यांच्या इटालियन असण्यावरून टीकेची झोड उठवली. राज्यात तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप युती असा तिरंगी सामना होता. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पवारांनी सोनिया गांधींवर केलेल्या टीकेमुळे नाराज होते आणि अशी जहरी टीका करणार्‍या राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास त्यांचा विरोध होता. काँग्रेसकडे तेव्हा 75 आमदार होते तर राष्ट्रवादीकडे 58. सरकार स्थापनेकरता हे दोन पक्ष एकत्र येतील असं कोणालाही वाटत नव्हतं. पण अनेक वेळा सत्तेपेक्षा आपले आमदार फुटून जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. आणि ती गोष्ट लक्षात ठेवूनच शेवटी काँग्रेसने पवारांनी सोनिया गांधींवर केलेल्या टीकेला मागे टाकत राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. काहीसा तोच प्रकार यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर अस्तित्वात आलेल्या सरकारच्या वेळी घडला.
2004 साली राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले होते तर काँग्रेसचे 69. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतरचा पवारांच्या पक्षाचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’. मात्र 2009 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून 144 ची मजल गाठली होती. त्यावेळी काँग्रेसला आघाडी सरकारच्या काळातील सर्वोत्तम म्हणजे 82 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला 62.
2014 साली महाराष्ट्राच्या राजकारणातील चारही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले आणि राष्ट्रवादीचा 41 हा सर्वात खराब परफॉर्मन्स झाला. काँग्रेसचाही सर्वात खराब परफॉर्मन्स याच निवडणुकीत 42 च्या रूपाने झाला. 1999 ते 2009 या काळात झालेल्या एकूण तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना मिळून 133, 140 आणि 144 जागा मिळाल्या आणि पाच किंवा सात अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या भरवशावर त्यांनी 145 ची मॅजिक फिगर गाठली होती. मॅजिक फिगर आणि काँग्रेस राष्ट्रवादीची बेरीज यांच्यातील तफावत 2014 साली 62 ला पोहोचली त्यावेळी शिवसेनेकडे 63 आमदार होते. पण ‘ऑफर’ असूनही कच खाऊन उद्धव ठाकरे भाजपबरोबरच राहिले. 2019 साली ही तफावत 47 झाली आणि शिवसनेकडे 56 आमदार होते. यावेळी मात्र मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे का होईना तीन पक्षांच सरकार अस्तित्वात आलं. अर्थात 44 आमदार असलेल्या काँग्रेसने सत्तेसाठी आपले आमदार फुटून जाऊ नयेत म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ही सुद्धा वास्तविकता आहे.
सध्या सेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 53 तर काँग्रेसकडे 44 असे 153 आमदार आहेत. म्हणजे सरासरीने प्रत्येक पक्षाकडे 51. आपला पक्ष वाढावा ही सर्वच पक्षांची इच्छा असते. 1984 साली लोकसभेत केवळ दोन सदस्य असलेला भाजप बाबरी विध्वंस आणि गोध्रा दंगलीच्या भरवशावर 303 पर्यंत पोचला आहे. काँग्रेस अशा हिंसक मार्गानी जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळेना जर काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचं असल्यास त्यांना त्यांच्या सध्याच्या संख्येत 101 नी वाढ केली पाहिजे. तिकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीसुद्धा येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या सुमारे 50,000 कोटी रुपयांच बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार असल्याची घोषणा केली.

Exit mobile version