निरोगी जीवनशैलीचा स्तुत्य योग!

श्रीशा वागळे

योग हा फक्त एक व्यायामप्रकार नाही तर ती जीवनशैली आहे. योगाभ्यासाची परिणामकारकता संपूर्ण जगाने मान्य केली आहे. योग हे भारतीय संस्कृतीचं एक महत्त्वाचं प्रतीक. तसं पहायला गेलं तर भारतीय संस्कृती ही जगातल्या महान संस्कृतींपैकी एक. आपल्या संस्कृतीने जगाला बरंच काही दिलं आहे. आपली जीवनशैली, ऋतुमानानुसार बदलणार्‍या आहारपद्धती आणि योगासनं ही दीर्घायुष्याची गुरूकिल्ली आहे, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. वसुधैव कुटुंबकम, हे विश्‍वची माझे घर असं म्हणणारी आपली संस्कृती वैश्‍विक एकतेचा संदेश देत असते. प्रत्येकाला सामावून घेत असते. भारतीय संस्कृतीने निसर्गाचं, पशुपक्षी, वृक्षवेलींचं महत्त्व जाणलं आहे. मानवाने निसर्गाचं भान राखत जगायला हवं हे या संस्कृतीने खूप आधीच जाणलं होतं. म्हणूनच तुकोबाराय ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे’ या अभंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन जातात. आपल्याकडे साजर्‍या होणार्‍या विविध सणांमागे, व्रतवैकल्यांमागे निसर्गाचीच प्रेरणा आहे. आपल्या प्रत्येक सणाची रचनाच निसर्गाला पूरक अशी आहे. आपण नागपंचमीला नागदेवतेची पूजा करतो. वसुबारसेला गाय-वासराची पूजा करून गोमातेने अखिल मानवजातीवर केलेल्या उपकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. चराचराचा आदर करण्याचे धडे देणारी अशी ही आपली संस्कृती. आजच्या काळात भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचं महत्त्व अधोरेखित होत आहे. ही संस्कृती परदेशवासीयांना आकर्षित करत आहे. पाश्‍चिमात्यांना भारताकडे वळवण्यात योगसाधनेचा महत्त्वाचा वाटा आहे. आज अनेक देशांमध्ये योगाभ्यास केला जातो. आज योग संस्कृती, देश, खंडांच्या सीमा ओलांडून सर्वदूर पोहोचला आहे.
योगामुळे फक्त शरीरच नाही तर माणूसही घडतो, हे एव्हाना जगाला पटलं आहे. योगाचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याला मान्यता दिली आणि 21 जून 2015 रोजी पहिलावाहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यंदाचं सातवं वर्ष. यंदाच्या योगदिनावर कोरोनाचं सावट असलं तरी तो ऑनलाईन माध्यमातून घरोघरी साजरा होणार आहे. योगाचे अभ्यासक आणि प्रशिक्षक या निमित्ताने योगसनांचं महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक उपक्रमांचं, कार्यक्रमांचं आयोजन करण्यात गुंतले आहेत. कोरोना काळात योगाचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच फुफ्फुस आणि एकंदरितच श्‍वसनसंस्थेचं कार्य सुधारण्यासाठी प्राणायाम, कपालभाती, दीर्घश्‍वसन किती उपयुक्त ठरू शकतं, हे आपण बघितलं. कोरोनाच्या या काळात शरीरच नाही तर मनही सक्षम असायला हवं. ध्यानधारणेच्या माध्यमातून हे मानसिक समाधान मिळवता येतं. मन:शांतीसाठी अनेकजण योगाचा आधार घेताना दिसतात. कोरोनाच्या या काळात मानसिक शांती मिळवण्यासाठी योगाचा आधार घेणार्‍यांची संख्या वाढते आहे. योगामुळे आपली अध्यात्मिक उन्नती होते. योगाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. काळाच्या ओघात योग लोप पावला नाही. उलट, त्याचं महत्त्व वाढत गेलं. निरोगी जीवनशैली अवलंबण्यासाठी योग अनेक अर्थांनी उपयुक्त ठरू शकतो, हे अनेकांना पटू लागलं आहे.
अनेक व्याधी आणि आजारांना चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरते. चंगळवादाच्या अंगिकारामुळे आपण आपलं आरोग्य गमावून बसलो आहोत. योगाच्या माध्यमातून आपण शाश्‍वत आणि निरोगी जीवनशैलीकडे वळू शकतो. योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवृत्ती मिळू शकते. योग अंगामध्ये नवचैतन्य निर्माण करतो. ईश्‍वरानं आपल्याला कशासाठी जन्माला घातलं, आपली ओळख काय, आपल्याकडून त्याला नेमकं काय अपेक्षित आहे या सर्व प्रश्‍नांची उत्तरं योगामध्ये मिळतात. आपण केवळ हाडामासाचा गोळा नाही तर त्यापेक्षा आणखी कोणी आहोत ही जाणीव निर्माण होण्यासाठी योगसाधना हवीच. आपलं आयुष्य कुठल्या दर्जाचं असावं, आपली पात्रता काय असावी हे आपण ठरवावं, जगानं नव्हे; ही जाणीव करून देतो तो योग! योगसाधनेत कर्मबंधनाचा विचार केला जातो. काही विकार कर्मबंधनामुळे निर्माण झालेले असतात. यावर कोणतंही औषध, उपचार प्रभावी ठरत नाहीत. एखाद्याचा मुलगा वाईट वागतो, घरातले संबंध कमालीचे तणावग्रस्त होतात. या सर्वामागे कर्मबंधनाचा विचार महत्त्वाचा ठरतो. योगसाधनेमुळे हे सर्व मळभ दूर होऊन डेबिट बॅलन्स के्रडिट बॅलन्समध्ये परावर्तीत होऊ शकतो. योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार या माध्यमातून शिकवला जाणारा योग सर्व दु:खांवर उपाय सुचवतो. यामुळे रोगच नव्हे तर दु:खहरणही होतं. ही योगाची क्षमता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपण स्वत:साठी खड्डा खणत आहोत. आपण इतरांना दोष देण्यात वेळ वाया घालवतो. पण स्वत:मधले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. यासाठी पौष्टिक, संतुलित आणि सात्विक आहार पूरक ठरतो.
माणसाचं मन हे मध्यस्थानी आहे. कारकिर्द, आरोग्य, निर्णयशक्ती, परस्परसंबंध या प्रत्येकात मनाची भूमिका महत्त्वाची असते. योगशास्त्रामध्ये सर्वप्रथम या मनाचा विचार केला जातो. योग व्यक्तीला उन्नत अवस्था देतो त्याप्रमाणे समाजाचीही उन्नती घडवतो. कारण योगाभ्यास हा एकट्यानं करण्याचा अभ्यास आहे तसंच सामुदायिकरित्याही योगसाधना केली जाते. सर्वांनी एकत्र येऊन प्राणायाम, ध्यानधारणा, मंत्रपठण केलं तर साहजिक बंधूभाव आणि एकी निर्माण होण्यास मदत होते. हा सामाजिक पैलूही विचारात घ्यायला हवा. सध्या व्यायाम न करणार्‍यांना वेळेची उपलब्धता नसणं हे कारण पुरतं. व्यायाम टाळण्यासाठी प्रत्येक वेळी ही सबब दिली जाते. मात्र हीच मंडळी फेसबुक अथवा वॉट्स अ‍ॅपवर तासनतास घालवतात. तुम्हाला या गोष्टींसाठी वेळ असेल तर योगसाधनेसाठी वेळ असायलाच हवा! आपण दात घासतो, आंघोळ करतो, दोन वेळा जेवतो. तितक्याच नियमितपणे योगसाधनाही व्हायला हवी. योगसाधना ही ‘अपॉइंटमेंट विथ मायसेल्फ’ या पद्धतीनं विचारात घ्यायला हवी. योगामुळे बहिर्मुखता कमी होते आणि अंतर्मुखता वाढते. ही स्वप्रयत्ने केलेली उन्नती असते आणि तीच महत्त्वाची असते. नशीब बदलण्याचा मार्ग योग दाखवतो. त्या दृष्टीनं त्याचं महत्त्व अनन्यासाधारण आहे. सद्यस्थितीत सार्‍यांचंच जीवन धावपळीचं, वाढत्या ताण-तणावाचं झालं आहे. त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम समोर येत आहेत. एखाद्यासाठी एखादं काम अवघड बनतं आणि परिस्थितीतला हा तणाव नंतर मन:स्थितीत ताण उत्पन्न करतो. म्हणूनच आधी मन:स्थिती सुधारून या ताणाचा सामना करायला हवा.
शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही अंगानं सक्षम झाल्यास कुठल्याही कामाचा ताण जाणवणार नाही हे त्रिवार सत्य आहे. पण हे घटक दुर्बल राहिले तर शरीर एखाद्या पांगुळगाड्यासारखं होईल. अशा गाड्यानं प्रवास करणं अशक्य आहे. सध्या आपण स्पर्धात्मक युगात वावरत आहोत. या युगाशी टक्कर घेण्यासाठी उत्तम स्मरणशक्ती, एकाग्रता आणि ध्येयासक्त नजर असायला हवी. या सर्वांबरोबर एकाच वेळी विविध कामं पार पाडण्याची क्षमताही असायला हवी. यासाठीदेखील योग महत्त्वाचा ठरतो. योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते. ग्रहण केलेलं ज्ञान बुद्धीमध्ये परावर्तीत होतं आणि त्याचा आवश्यकतेप्रमाणे वापर होऊ शकतो. अस्थिर मनाचं संतुलन साधणं देखील योगसाधनेमुळेच शक्य होतं. या उद्देशानंच पतंजली ऋषींनी योगसूत्रं लिहिली. स्पर्धात्मक युगात एकाग्रता अभंग रहावी यासाठी आपणही या सूत्रांचा अवलंब करायला हवा. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून याची सुरुवात करायला हरकत नाही. उपनयन संस्कारांद्वारे याच वयात योगसाधनेची सुरुवात करण्याचे संकेत मिळतात. उपनयन म्हणजे मनावर केलेले संस्कार. यावेळी मुलांना सूर्यनमस्कार शिकवले जातात. हे संस्कार आयुष्यभर उपयुक्त ठरतात. माणूस संस्कारक्षम प्राणी आहे. आपल्याकडे संस्कारक्षम मन आहे. योगसाधनेतून होणारे संस्कार या मनाला सक्षम करतात. हे लक्षात घेऊन शालेय जीवनापासून योगाभ्यासाची शिकवण दिली जाण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीनेही योग साधनेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकजण एकत्र येऊन ध्यान, भजन, कीर्तन, प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार करत असतील तर त्यातून सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लागते. शंभर माणसं एका वेळी ओंकार म्हणतात तेव्हा होणारा परिणाम अद्भूत असतो. माणसानं एकट्यानं शंभर वेळा ओंकार म्हणणं आणि शंभरजणांनी एका वेळी ओंकार म्हणणं यात महदअंतर आहे. म्हणूनच समाजानं एकत्र येऊन योगसाधना करायला हवी. हे आत्म्यावर होणारे संस्कार आहेत. यामुळे सहिष्णुता, बंधुभाव, परस्परांना मदत करण्याची वृत्ती आणि एखादी वस्तू वाटून घेण्याची भावना वाढीस लागते. जीवनामध्ये रस वाटण्यासाठी जीवनाबद्दल, स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल प्रेम हवं. यश आणि अपयशाची पर्वा न करता जगण्याची हौस हवी, जगण्याचं साहस हवं. योगसाधनेमुळे हे सर्व साधतं. हे लक्षात घेता योगाभ्यास ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट होतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्वही समोर येतं.

Exit mobile version