स्काऊट गणवेशसाठी फक्त तीनशे रुपये अनुदान
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या स्काऊट गाईडचा गणवेश देण्याचा दिखावा शिक्षण विभागाने केल्याचा प्रकार समोर येत आहे. एका गणवेशसाठी तीनशे रुपये अनुदान देण्याची हालचाल सुरु झाली आहे. सध्या महागाईच्या जगतामध्ये कापडाची किंमतच तीनशेहून अधिक रुपये असून, त्याचा शिलाई खर्च तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तीनशे रुपये अनुदान देऊन विद्यार्थ्यांची थट्टाच केली जात असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच शिस्त राहावी, एक जागरुक नागरिक निर्माण व्हावा, शालेय स्तरापासूनच वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी अधिक निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्काऊट गाईड गणवेश देण्याचा निर्णय घेतला.
रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 501 शाळा आहेत. या शाळांमध्ये 87 हजार 92 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत पाच हजार 888 शिक्षक असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शाळांमध्ये ‘दप्तराविना शाळा’ सारखे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासबरोबरच बौद्धिक व शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती मिळावी, त्यांना शालेय स्तरापासूनच शिस्त राहावी, एक जागरुक नागरिक निर्माण व्हावेत यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्काऊट गणवेश देण्याचा निर्णय घेतला. गतवर्षापासून हा उपक्रम हाती घेतला. गेल्या वर्षी कापड देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, स्काऊटचे कापडच शाळांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ही योजना बारगळली होती. यावर्षी कापडऐवजी थेट गणवेशासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अनुसूचित जाती, जमाती मागासवर्ग व सर्वसाधारण मुलांसह सर्व वर्गातील मुली अशा एकूण 98 हजार 572 विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपयांप्रमाणे दोन कोटी 57 लाख एक हजार 600 रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठविण्यात आला. हा निधी तालुकास्तरावर ऑगस्ट महिन्यात वितरीत करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी स्काऊडचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात आले आहे. परंतु, स्काऊडच्या गणवेशासाठी लागणारे अनुदान तुटपुंजे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे शिक्षकांवर आर्थिक बोजा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महागाईत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. कापडाच्या किमतीही भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्यांना कापड खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात शिक्षण विभागाकडून स्काऊट गणवेशासाठी तीनशे रुपये अनुदान देऊन विद्यार्थ्यांची थट्टाच केल्याचे चित्र आहे. दर्जेदार कापडासाठी या अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित गणवेशासह स्काऊट गाईड गणवेशसाठी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तालुक्याला निधी वर्ग करण्यात आला आहे. गणवेश शिवण्यासाठी शिक्षण विभागाने कोणत्याही बचत गटासह ठेकेदाराकडे काम दिले नाही. कामात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी देण्याच्या सुचना केल्या आहेत.
ललिता दहितुले,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
स्काऊट गाईड गणवेशासाठी तीनशे रुपयांचे अनुदान देण्याचा शिक्षण विभागाने उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम चांगला आहे. परंतु, अनुदानाची रक्कम तुटपुंजी आहे. महागाईमध्ये साधे कापडही तीनशे रुपयांत मिळत नाही. त्यामुळे शासनाने या अनुदानात वाढ करावी.
सुरेश खैरे,
शेकाप जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषद माजी सदस्य
