शिक्षणाचा बट्ट्याबोळ! विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा भार आता शिक्षकांवर

रायगड जि.प. शिक्षकांना पुरवणार प्रशासकीय रसद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात आले होते. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालवल्याचे पनवेल येथे झालेल्या पर्यवेक्षीय अधिकार्‍यांच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता सभेत समोर आले आहे. यापुढे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रशासकीय पाठबळाची रसद पुरवण्यात येईल, असा विश्‍वास रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग आणि संपर्क फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, शेडुंग, पनवेल येथे पर्यवेक्षीय अधिकार्‍यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता सभा पार पडली. गुणवत्ता कार्यशाळेस रायगड जिल्हा समन्वयक मनाली मढवी, संदेश देवरुखकर, आदेश नांदविकर, गीतांजली घोलप, पनवेल गटशिक्षणाधिकारी मोहिते, जिल्हा उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे ,जेएसडब्ल्यू कंपनीचे सी.एस.आर्.चे मुख्य समन्वयक संतोष पाटील, उपशिक्षणाधिकारी (समग्र शिक्षा) रमेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी चोरमले, कक्ष अधिकारी कल्पना काकडे, गुणवत्ता विकासचे जिल्हा समन्वयक संदीप वारगे, मुख्याध्यापिका विशाखा सरवदे व जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी उपस्थित होते. निंबाजी गीते श्रीवर्धनचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे, नाविन्यपूर्ण पद्धती विकसित करून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे आणि शिक्षण प्रक्रियेत गतिमानता निर्माण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गतिमान प्रशासन व गुणवत्तापूर्ण शिक्षण यांसाठी विशेष उपक्रम सुरू केलेले आहेत. विविध प्रशासकीय कामांचा व गुणवत्तेचा सतत आढावा घेऊन पाठपुरावा करण्याच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या धोरणाचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि गणित विषय साधन व्यक्ती यांची गुणवत्ता सभा घेण्यात आली.

कोरोना कालकावधीत शाळा बंद असल्याने मुलांना ऑन लाईन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला होता. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये म्हणावा तसा फरक पडलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शिक्षकांच्या हातांना बळ मिळावे, यासाठी प्रशासकीय पातळीवरुन विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शाळांना टप्प्याटप्प्याने शैक्षणिक साहित्य पुरविणार
दरमहा प्रत्येक तालुक्यात भेट देऊन सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांची सभा घेऊन यशोगाथा पाहणार आहेत. या भेटीचे पूर्ण नियोजन करण्यात आले. गुणवत्ता सभेच्या दुसर्‍या सत्रात पर्यवेक्षीय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पर्यवेक्षीय अधिकार्‍यांना कर्तव्य व जबाबदार्‍या बाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. संपर्कचे राज्य समन्वयक उल्हास शहा यांनी स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन, शैक्षणिक गणित पेटीचा वापर, अँड्रॉइड प द्वारे सनियंत्रण कसे ठेवावे याबाबत सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. संपर्क फाउंडेशन तर्फे प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य व कार्यपुस्तिका देण्यात आल्या. – गणित विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी पथदर्शी शाळा म्हणून सहा तालुक्यातील दोनशे शाळांची व 15 मॉडेल स्कूलची निवड करण्यात आली होती. सदर शाळांतील शिक्षकांना गणिताचे विशेष प्रशिक्षण व साहित्य देण्यात आले. यापुढेही जिल्ह्यातील सर्व शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक साहित्य व प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या प्रशासकीय व तांत्रिक कार्यालयीन कामकाजात जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही दिरंगाई होणार नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची तडजोड केली जाणार नाही. प्रशासन शिक्षकांच्या सर्व वैध अडचणी गतिमानतेने सोडणार आहे मात्र शिक्षकांनी गुणवत्तेला कटिबद्ध राहायलाच हवं.

पुनिता गुरव, जिल्हा शिक्षणाधिकारी


Exit mobile version