आंबा बागायतदार चिंतेत
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आंबा हंगामाला पोषक वातावरण असताना गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उष्णता आंबा पिकांवर दुष्परिणाम करणारी ठरत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांना उष्णतेची झळ असाहाय्य होत असताना आंबा पीकही त्यातून सुटलेले नाही. उच्च तापमानामुळे आंब्यावर डाग तसेच, फळगळतीला सुरुवात झाली आहे. आधीच उत्पादन कमी असताना उष्णतेमुळे आंबा डागाळून खराब होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहे.
सध्या उष्णतेमुळे आंबा पिकावरही विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यात आंबा पीक वाढीच्या काळात किमान तापमान 22 ते 25 अंश असते; तर कमाल तापमान हे 30 ते 32 अंश असते. मात्र, यंदाच्या वाढत्या तापमानामुळे प्रथमच उष्णतेमुळे फळांचा राजा संकटात आला आहे. दरवर्षी आंबा पिकाला नैसर्गिक संकटाचा सामना करावाच लागतो. आंबा पिक दिवसेंदिवस खर्चिक बनले असून, उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पिक वाचवण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू असून नैसर्गिक संकटापुढे वापरलेले पर्याय सध्यातरी कमकुवत ठरत आहेत. कारण या काळात आंबा झाडाला पाण्याची आवश्यकता असते. परंतु, उष्णतेमुळे भूजल पातळी कमी होवू लागली आहे. त्याचबरोबर इतक्या झाडांना पाणी पुरवणे अशक्य झाले आहे. गतसाली पावसाळा थोडा लांबला. यामुळे पालवी मोठ्या प्रमाणात आली. डिसेंबर महिन्यात थंडीही चांगली पडली. यामुळे मोहरपण मोठ्या प्रमाणात आला. मात्र, फुलोरा सर्वाधिक राहिला, पण फळधारणा अत्यल्पच झाली. एकूणच या वर्षी आंबा पीक संकटात असताना या उष्णतेच्या लाटेने त्यात भर पडली आहे.
जंगलतोडीमुळे तापमानवाढ
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. दररोज शेकडो ट्रक लाकूड भरून परजिल्ह्यात जात आहे. अक्षरश: जंगले ओस पडत आहेत. शेवटी याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम आता सोसावा लागत आहे. उष्णतेत वाढ होऊ लागली आहे.