कोट्यवधी रुपयांचे 36 हजार शेतकर्यांना कर्ज वितरण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी पुढाकार घेतला आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत भाजी व इतर पीक लागवड तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी करोडो रुपयांचे कर्ज शेतकर्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 36 हजार 988 शेतकर्यांना बँकांचा आधार मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या 31 बँका आहेत. या बँकांच्या शाखा 566 हून अधिक आहेत. जिल्ह्यात भातपिकाबरोबरच भाजीपाला व इतर पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून केला जातो. शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील बँकांमार्फत वेगवेगळे उपक्रम सुरु करण्यात आले. वेगवेगळ्या उत्पादन लागवडीबरोबरच शेतीपूरक व्यवसायासाठी बँकांकडून कर्जपुरवठा करण्यात आला आहे. पारंपरिक शेतीवर शेतकरी अवलंबन न राहता, शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करून उद्योग उभारणीसाठी बळ देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
ऑगस्ट ते मार्च या रब्बी हंगामात सहा हजार 40 शेतकर्यांना 85 कोटी 63 लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामात 30 हजार 948 शेतकर्यांना 279 कोटी 91 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बँकांनी शेतकर्यांना कर्जपुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्यांना स्वस्त आणि सुलभ कर्ज देण्यासाठी सरकारने सुधारित व्याज सवलत योजनेंतर्गत कर्जमर्यादा तीन लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत केली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी केले आहे.