। मुंबई । प्रतिनिधी ।
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे ट्वीट करत सांगितले. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, जे फोटो काल समोर आले त्यानंतर लोक भावनिक झाले. यामुळे सरकारला झुकावे लागले. गुडघ्यावर यायला लागले. हे फक्त सर्वसामान्य लोकं आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळे झाले. सरकारने याचं क्रेडिट घेऊ नये. तसेच, धनंजय मुंडेंनीही याचं क्रेडिट घेऊ नये की मी नैतिकता म्हणून राजीनामा देतो. कारण तीन महिने तुम्ही फक्त टाईमपास केला, अंहकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे खरं आहे, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले की, दुर्दैव इतकंच आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानतंर तो व्यक्ती परत येऊ शकत नाही. परंतु, न्याय मिळायला सुरुवात झाली, असं आपल्याला म्हणावं लागले. असाच न्याय आपल्याला सुर्यवंशी कुटुंबालाही द्यायचा आहे. मात्र, देशमुख कुटुंबाची आणि सर्वसामान्यांची अजून एक मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवं. कारण त्या कंपनीकडून पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, असं भाजपचा आमदार पुराव्यासह जर म्हणत असेल तर मग सहआरोपी करुन पारदर्शकपणे याची चौकशी होणं तितकंच महत्त्वाचे आहे.