ममदापूरसाठी आठ कोटींच्या कामांचा आराखडा

नेरळ प्राधिकरणाचा निर्णय,जि.प स्थायीची मंजुरी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणने ममदापूर विकासासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. शिवाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.ममदापुर भागाच्या विकासासाठी प्राधिकरण कडून विकास आराखडा बनविण्यात आला असून त्या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
नेरळ ममदापूर विकास संकुल प्राधिकरणची निर्मिती झाल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ममदापुर गावाच्या बाहेर वसाहत उभी राहू लागली.आजच्या घडीला त्या भागात 200 हुन अधिक इमारती आणि तीन गृह संकुल उभी राहिली आहेत.मात्र तेथे पायाभूत सुविधांपासून दैनंदिन गरजा या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत.त्याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमे यांनी जोरदार आवाज उठवला होता
पहिल्या टप्प्यात ममदापूर नागरी वसाहती मध्ये 45 लाख खर्चाची दोन कामे यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.त्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 30 लाख खर्चून तर निधी कॉम्प्लेक्स या रस्त्यासाठी 15 लाख खर्च आरक्षित करण्यात आला आहे. त्याशिवाय आता नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण कडून ममदापुर गाव आणि नवीन वसाहत साठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. साधारण आठ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने परवानगी दिली आहे.त्यामुळे आगामी काही महिन्यात ममदापुर गाव आणि नागरी वसाहत भागात पायाभूत सुविधांची कामे सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या विकास आराखड्यात ममदपूर नागरी वसाहत आणि ममदापुर गावातील मुख्य रस्ता भडवळ गावाच्या हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार आहे.तुलसी बिल्डर कार्यालय ते दिलकॅप कॉलेज हा रस्ता शिवाय सेंट्रल गार्डन ते ममदापुर गाव रस्ता बनविला जाणार आहे.तसेच अन्य चार रस्त्यांची कामे केली जाणार असून सर्व रस्ते पुढील 20वर्षे करण्याची आवश्यकता भासू नये यासाठी सिमेंट काँक्रीटचे बनवले जाणार आहेत. स्मशानभूमी बांधणे आणि नळपाणी योजना सक्षम करण्याचे काम देखील विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.
तर ममदपूर येथे नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरणचे वार्ड ऑफिस देखील बांधले जाणार असून नवीन वसाहतीमध्ये राहण्यासाठी येणार्‍या हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवर सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सक्षम असावे यासाठी नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभे केले जाणार आहे.

आम्ही गेली अनेक वर्षे ममदापुर गावातील पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहोत.आता जिल्हा परिषदेने ममदापुर गाव आणि वसाहत परिसराचा विकास आराखडा मंजूर केल्याने लवकरच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू होईल.
दामू निरगुडा-सरपंच

आम्ही गेली अनेक वर्षे ममदापुर गावातील विकास व्हावा यासाठी नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरणकडे प्रयत्न केले आहेत.आता त्या प्रयत्नांना यश मिळत असेल तर आनंद आहे.आम्हाला आता प्रतीक्षा असून लवकरच विकास कामे सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
शाकिब पालटे-अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन

Exit mobile version