स्थानिकांची प्रवासादरम्यान तारांबळ
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विकास संकुल प्राधिकरणमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. गावात प्रवेश करणारे रस्ते खड्ड्यांनी व्यापले असल्याने स्थानिकांना आजही चिखलमय रस्त्याने जावे लागत आहे. दरम्यान, नेरळ विकास संकुल प्राधिकरणमधील ग्रामपंचायतीबद्दल सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते प्राधिकरणाच्या कारभारावर नाराज आहेत.
नेरळ विकास संकुल प्राधिकरण नेरळ तसेच कोल्हारे आणि ममदापूर ग्रामपंचायतीमधील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी नेमलेली संस्था आहे. रायगड जिल्हा परिषद आणि राज्य सरकारचे नगररचना विभाग यांच्या माध्यमातून नेरळ विकास संकुल प्राधिकरण बनविण्यात आले आहे. या प्राधिकरण हद्दीमधील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्यांची अवस्था दयनीय अशीच आहे. ममदापूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर हाडदे असल्याने पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून जावे लागले होते. त्यानंतर त्या ठिकाणाचा रस्ता बनविण्यास नेरळ विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्या कामासाठी देण्यात आलेला निधी हा अपुरा असून, जिल्हा परिषद स्थानिकांच्या अडचणी दूर करण्यात कमी पडत आहे. त्यात ममदापूर गावातील नवीन वसाहतीमधील रस्त्यांची स्थितीदेखील चिखलमय रस्ते अशी बनली आहे. त्या रस्त्यातून होणारी वाहतूक ही स्थानिकांच्या अंगावर चिखल उडवत होत असल्याने दररोज वादाचे प्रसंग निर्माण होत असतात.
सध्या ममदापूर गावातील आणि वसाहत भागातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे ही स्थानिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. दुसरीकडे वसाहत भागातून गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते अजूनही काँक्रिटचे बनले नाहीत, याबद्दल देखील स्थानिक ग्रामस्थ रोशन शिंगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात नवीन वसाहत आणि गाव यामध्ये नेरळ संकुल विकास प्राधिकरण विकासकामांच्या बाबतीत दुजाभाव दाखवत असल्याचा आरोप ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णा शिंगे यांनी केला आहे. आमच्या गावासाठी निधी द्या आणि आधी सर्व रस्ते प्राधिकरणाकडे पडून असलेल्या करोडो रुपयांच्या निधीमधून व्हावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.







