। जालना । प्रतिनिधी ।
जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. संध्या प्रभुदास पाटोळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
जालन्यातील गांधीनगरात संध्या पाटोळे ही अंगणात खेळायली गेली असता तीन ते चार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे लचके तोडले. यात गंभीर जखमी होऊन तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मागील एक वर्षापासून जालन्यातील सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत महानगरपालिकेला लेखी निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु, प्रत्येक वेळेस टेंडर काढलेले आहे, लवकरच कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल असे पोकळ आश्वासन पालिकेच्यावतीने देण्यात येऊन सामाजिक संघटनांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली गेली आहे.