गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईकांकडून शोधाशोध
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल परिसरातील सागमळा येथील 72 वर्षीय वयोवृध्द बेपत्ता झाले आहेत. शनिवारी (दि.31) रात्री घरातून ते बाहेर गेले. मात्र त्यांचा अद्याप तपास लागला नाही. त्यांचे नातेवाईक गेल्या दोन दिवसापासून त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी हरविल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोणाला सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांसह त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ बाळू घरत (72) असे या वयोवृध्द बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. ते चौल परिसरातील राम मंदिर जवळील सागमळा येथे राहणारे आहेत. शनिवारी सायंकाळी ते घरात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर गेले. मात्र त्यानंतर ते घरी परत आले नाही. अखेर त्यांच्या मुलांनी आजूबाजूला तसेच परिसरातील गावांमध्ये जाऊन विचारणा केली. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर हरविल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमोल घरत यांनी मंगळवारी (दि.3) दुपारी रेवदंडा पोलीस ठाण्यात केली.
काशिनाथ घरत हे अंगाने सडपातळ असून रंग गोरा आहे. चेहरा उभट, छातीवर डाव्या बाजूला दोन तीळ, अंगात पांढऱ्या राखाडी रंगाचा, उभी लाईन असलेला शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात निळ्या रंगाची चप्पल, गळ्यात लाल रंगाचा दोरा असे वर्णन आहे. कोणाला सापडल्यास रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
