| डोंबिवली | प्रतिनिधी |
डोंबिवली पश्चिमेत एका 73 वर्षाच्या वृध्द महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत एका 62 वर्षीय वृद्धाने लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. वृद्धाने त्या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम अशी एकूण 57 लाख 40 हजार रूपयांची लूट आणि फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात 62 वर्षीय वृध्दाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय वृद्धाने वृत्तपत्रात समवयस्क जोडीदार मिळावा म्हणून लग्नासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून ती व्यक्ती महिलेच्या संपर्कात आली, त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. या महिलेचा विश्वास संपादन करत वृद्धाने आपण पुणे येथे घर घेऊन एकत्रित राहू असे आश्वासन दिले. आपणास चांगला जोडीदार मिळतो असा विचार करून फसवणूक झालेल्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आपण लग्न करून एकत्र राहू असा खात्रीलायक विश्वास त्यांच्याकडून महिलेला मिळाल्याने पीडित महिलेने त्यांच्याबरोबर त्यांच्या मागणीप्रमाणे आर्थिक व्यवहार सुरू केले. यांनी वृध्देला पुणे येथील घर खरेदीसाठी वृध्देकडून 35 लाख रूपये टप्प्याने काढून घेतले. घर खरेदीच्या बनावट पावत्या त्यांना दाखवल्या. तसेच या महिलेच्या डोंबिवली मधील घरात रहात असताना वृद्धाने महिलेच्या घरातील कपाटातील 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने वृध्देच्या नकळत चोरले. त्यांचे डेबिट कार्ड चोरून त्या माध्यमातून बँकेतून 2 लाख 40 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. असा एकूण 57 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज घेतल्यानंतर त्यांनी वृध्द महिलेला टाळण्यास सुरूवात केली. यानंतर महिलेने घरातील ऐवजाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचा ऐवज गायब होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.