| कोलाड | वार्ताहर |
रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका 75 वर्षीय महिलेकडून एक किलो गांजा रोहा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. तर कारवाईमुळे गांजाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा रेल्वेस्थानक पटरीच्या बाजूस झोपडीमध्ये एका 75 वर्षीय महिलेने विक्रीसाठी गांजा आणला आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना समजताच गुरुवारी (दि.29) रोजी रात्री 8.20 वाजण्याच्या सुमारास सापळा रचला व पोलिसांनी त्या महिलेकडील 34 हजार 640 रुपये किमतीचा एक किलो 732 ग्रॅम वजनाचा बेकायदा गांजा जप्त केला आहे. या महिलेविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली असून, पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पायक पुढील तपास करीत आहेत.