रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर; 18 डिसेंबरला होणार मतदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे 7649 ग्रामपंचायतीच्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 तालुक्यातील तब्बल 240 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या 240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील 6, उरण 18, कर्जत 7, खालापूर 14, तळा 1, पनवेल 10, पेण 26, पोलादपूर 16, महाड 73, माणगाव 19, मुरुड 5, म्हसळा 13, रोहा 5, श्रीवर्धन 13, सुधागड 14 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. नजिकच्या काळात त्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी 15 तालुक्यातील या 240 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्याने ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची रंगीत तालीम ठरणार असल्याने या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत.

अलिबागमधील या ग्रामपंचायतींचा समावेश
अलिबाग तालुक्यातील आक्षी, नारंगी, बोरीस, मुळे, वैजाळी व शिरवली या ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबरला तर मतमोजणी 20 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version