| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूक नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. थेट सरपंचमुळे 18 सरपंचाची निवड झाली आहे. आता उपसरपंच पदाची निवड ही येत्या नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार दि. 2 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. त्याआधी सरपंच पदभार घेतील त्यानंतर लगेच उपसरपंचपदाची निवड होणार आहे. त्यामुळे उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
थेट सरपंच निवडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर सरपंच ही निवड झाली आहे. त्यामुळे आता उपसरपंच निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. काही ठिकाणी सरपंच एका पक्षाचा निवडून आला मात्र सदस्य दुसर्या पक्षाचे निवडून आले आहेत, त्यामुळे विद्यमान सरपंचाला उपसरपंचामुळे गोची होण्याची शक्यता आहे. यामूळे ज्या पक्षाचा सरपंच निवडून आला आहे. ते आपल्याच पक्षाचा उपसरपंच निवडून यावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यातील काही ग्रामपंचायतमध्ये सरपंच एका पक्षाचा तर उपसरपंच दुसर्या पक्षाचा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामपंचायतमध्ये सर्व बॉडी आपल्याच पक्षाची असल्यावर काम करण्यास अडचण येत नाही.तसेच गैरप्रकार झालेतरी ते उघड होत नाही. यासाठीच उपसरपंचसाठीही घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येत्या सोमवार दि. 2 जानेवारी रोजी उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते याचा फैसला तेव्हाच होईल तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.