। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील जीवना बंदर या ठिकाणी जेट्टीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे दांडा या ठिकाणीदेखील जेट्टीचे काम सुरू आहे. या जेट्टीच्या कामासाठी डंपरमधून मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, या डंपर चालकांच्या बेजबाबदार पणामुळे अनेकवेळा येथील महावितरणच्या विजेच्या खांबांना धडक मारण्यात आली आहे. एका खांबाला जरी जोरदार धडक बसली तरी सोबत दोन ते तीन खांबांचे नुकसान होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या सर्व वीज वाहकतारा तुटून जातात. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तासंतास खंडित होत आहे. खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यास महावितरणच्या कर्मचार्यांना जवळजवळ सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून श्रीवर्धन शहरातील हॉटेल व रिसॉर्ट्स पूर्णपणे फुल आहेत. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
पंधरा दिवसापूर्वी श्रीवर्धन येथील आंबेडकर चौकामधील एका वीज खांबाला एका डंपरने धडक मारल्यानंतर जवळजवळ साडेसात तास वीज पुरवठा खंडित झाला होता. दांडा जेट्टीसाठी दगड वाहतूक समुद्र किनार्याच्या बाजूने करण्यात येते. या ठिकाणाहूनच डंपरची लाईन जात असताना मोरया बीच हाऊस समोर असलेल्या वीजेच्या खांबाला डंपरने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या ठिकाणचे दोन खांब तुटून विजवाहक तारा देखील तुटल्या होत्या. त्यामुळे अशाप्रकारे दगडाची वाहतूक करणार्या डंपर मालकांनी व जेट्टीच्या ठेकेदरी कंपनीने डंपर चालकांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व पर्यटनाशी निगडीत व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.