स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहक हैराण

सर्व्हर डाऊनमुळे बिल भरण्यास अडथळा

| महाड | प्रतिनिधी |

शहरात स्मार्ट वीजमीटर प्रणालीमुळे अनेक वीजग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा सोशल मीडियावरील व्हाॅट्सॲप गटांमध्ये रंगली आहे. महावितरणचा सर्व्हर तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने वीजबिलाचा भरणा होत नसल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना बिल भरूनही तातडीने वीज सुरू करता येत नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्मार्ट मीटरमध्ये थकबाकी असल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होतो आणि बिल भरल्यानंतर लगेचच वीज सुरू होते. मात्र, सर्व्हरच कार्यरत नसल्यास बिल स्वीकारले जात नसल्याने ग्राहकांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच जर महावितरणचा सर्व्हरच बंद असेल, तर ग्राहकांनी सर्व्हर सुरू होईपर्यंत अंधारात राहायचे का, पैसे भरूनही त्रास का सहन करायचा, असा संतप्त सवालही काही ग्राहकांनी उपस्थित केला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी 7972868342 या क्रमांकावरील मांडवकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला असून, त्यांची टीम येऊन मीटर सुरू करून देईल असे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर, यावर कोणताही पर्याय नाही. स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, असे उत्तर मिळाल्याचेही ग्राहकांनी नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट मीटर प्रणालीतील तांत्रिक अडचणींच्या काळात ग्राहकांसाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध आहे का, तसेच अशा परिस्थितीत महावितरणची अधिकृत कार्यपद्धती काय आहे, याबाबत महावितरणने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी महाडमधील वीजग्राहकांकडून केली जात आहे.

Exit mobile version