ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील वांजळोशी, तळेगाव व पन्हेली या तीन ग्रामपंचायतींतर्फे वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे तळा महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले आहे. या तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत बोरीचा माल, चोरवली, कासेखोल, गणेशनगर आदी गावे येत असून या गावांना वारंवार वीजपुरवठ्यापासून कायम वंचित राहावे लागत आहे. ही सर्व गावे महावितरण विभागाला वेळोवेळी सहकार्य करीत असूनही फेब्रुवारी महिन्यापासून येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्यातही या गावांचा वीजपुरवठा चार चार दिवस खंडित होत आहे. ही गावे ग्रामीण भागात येत असल्याने काही नागरिकांचे व्यवसाय व पाणीपुरवठा योजना या विजेवर अवलंबून आहेत. मात्र, वारंवार खंडित होणार्‍या विजपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा वीजपुरवठा सुरळीत व निरंतरपणे सुरू ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून तळा महावितरण विभागाला करण्यात आली आहे.

Exit mobile version