विद्युत डीपी/ट्रान्सफॉर्मरवर बसवले मीटर
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील विद्युत डीपींवर मीटर बसवण्यात आल्याने वीजचोरीवर अंकुश ठेवला जाणार आहे. पनवेलमधील वीजचोरीवर आता लक्ष ठेवले जात आहे. तालुक्यातील सगळ्या ट्रान्सफॉर्मरवर मीटर लावण्यात येत आहेत. मीटर लावल्यामुळे होणार्या चोरीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ट्रान्सफॉर्मरवर मीटर लावल्यामुळे विजेचा वापर किती होतो याची माहिती मिळेल, तसेच संबंधित ट्रान्सफार्मरमधून किती ग्राहक जोडले आहेत आणि त्यांचा वापर किती होतो आणि चोरी किती होते, याची माहिती मिळेल. त्यानंतर याच माहितीच्या आधारे अचानक महावितरणचे अधिकारी छापा टाकू शकतात. त्यामुळे वीजचोरीवर लगाम लागू शकतो.
ट्रान्सफॉर्मरच्या मीटरवरील रीडिंग आणि त्या ट्रान्सफॉर्मरवर असलेल्या एकूण ग्राहकांच्या मीटरमधील युनिटमध्ये जास्त अंतर असेल, तर त्या ठिकाणी चोरी होते हे महावितरणच्या निदर्शनास येईल. त्यामुळे हे मीटर महावितरणला फायदेशीर ठरणार आहेत. आजही वीज चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. मीटरमध्ये छेडछाड करून ही विजेची चोरी केली जाते. अनेकदा महावितरणचे कर्मचारी विजेची चोरी पकडतात. यावेळी त्यांना मारहाण देखील केली जाते. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचार्यांना मारहाण करू नये असे आवाहन वारंवार केले जाते. मारहाण करणार्यांवर गुन्हेदेखील दाखल होतात.