| पनवेल | वार्ताहर |
‘महावितरण’च्या भरारी पथकाने कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटवर छापा मारुन सदर हॉटेल चालकाकडून होत असलेली तब्बल 9 लाख 48 हजार रुपयांची वीज चोरी पकडली आहे. या हॉटेल चालकाने ‘महावितरण’च्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन आर फेज सीटीला छिद्र पाडून मीटरमध्ये होणार्या विजेचे मापन होऊ न देता मागील वर्भभरापासून वीजचोरी केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे ‘महावितरण’ने कळंबोली पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ‘महावितरण’ने नोव्हेंबर 2023 मध्ये देखील या हॉटेल चालकावर वीजचोरी केल्याप्रकरणी कारवाई केली होती.
कळंबोलीतील न्यू अजवा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील आणि पनवेल भरारी पथकाचे वरिष्ठ तंत्रज्ञ मुकुंद चितळे आदिच्या पथकाने न्यू अजवा रेस्टॉरंटवर छापा मारला. त्यानंतर भरारी पथकाने तेथील मीटरची तपासणी केली असता, मीटरची बॉडी संशयास्पद स्थितीत असल्याचे आढळून आले.
तसेच, मीटरच्या बॉडीवर डाव्या बाजुस छिद्र पाडल्याचे तसेच मीटरच्या आतमधील आर फेजच्या सीटीला छिद्र पाडून आर फेजला डॅमेज केल्याचे आणि त्यामुळे मीटर मंदगतीने चालत असल्याचे निदर्शनास आले. अशा पध्दतीने सदर रेस्टॉरंटने मागील वर्षभरामध्ये एकूण 41, 570 युनिटस्ची एकूण 9 लाख 48 हजार 250 रुपयांची वीजचोरी केल्याचे ’महावितरण’च्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने या वीजचोरी प्रकरणात सदर रेस्टॉरंट चालक फवझान तल्हा बलवा याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.
‘महावितरण’कडून लाखोंची वीजचोरी उघड
