| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलमधील तक्का परिसरात वीज वितरण विभागाच्या डीपीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर माती आणि चिखल साचला असून, डीपी मागील बाजूस झुकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसामुळे परिसरातील माती चिखलमय झाली असून, डीपीच्या सभोवतालची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वीज वितरणाची महत्त्वाची यंत्रणा अशा अवस्थेत असतानाही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे, डीपीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर माती व चिखल साचलेला असताना पालिका प्रशासनाकडूनही या भागाची स्वच्छता कधी केली जाणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळ्यात अशा विद्युत यंत्रणेच्या परिसरात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डीपी झुकलेल्या अवस्थेत असल्याने संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, तसेच पालिकेने डीपी परिसरातील चिखल-माती हटवून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन आणि वीज वितरण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तक्का परिसरात वीज डीपी धोकादायक अवस्थेत
