टॉपेडो, जार, क्षत्रप, कलचुरी नाण्याचे पुरावे
| चिरनेर | प्रतिनिधी |
एलिफंटा बेट हे केवळ धार्मिक आणि शैलकलेसाठी प्रसिद्ध नसून, प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र होते. त्याचे ठोस पुरावे भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्खननातून समोर आले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्खननात रोमन फोराचे तुकडे, आयातीत सिरॅमिक्स, काचेच्या वस्तू, पश्चिम आशियातील टॉपेडो जार क्षत्रप व कलचुरी नाणी यासारखे महत्त्वाचे पुरावे आहेत.
उत्खननातील निष्कर्षानुसार समुद्रमार्ग आलेला आयात माल एलिफंटा येथे उतरविण्यात येत होता. तिथून तो उल्हास खाडीमार्गे कल्याण पर्यंत जाई, पुढे नाणेघाट खिंडीतून जुन्नर व दख्खनच्या अंतर्भागात पोहोचविला जात असे. त्याच प्रमाणे दख्खनमधील निर्यात मालही याच मार्गाने समुद्रापर्यंत आणला जात होता.

डॉ. आंबेकर यांच्या मते एलिफंटावरील भव्य गुहा आणि स्थापत्यकला यांचा केवळ धार्मिक दृष्टीने अभ्यास झाला होता. मात्र, एका लहान आणि भरती ओहोटीचा परिणाम होणाऱ्या बेटावर एवढी मोठी धार्मिक व स्थापत्य गुंतवणूक का झाली. याचे उत्तर आता उत्खननातून मिळू लागले आहे. पश्चिम भारतातील बौद्ध ब्राह्मणी आणि जैन परंपरांशी संबंधित सुमारे 900 शैल कोरीव स्थळांपैकी 130 स्थळे मुंबई परिसरातील बेटांवर, विशेषता एलिफंटा आणि सालसेट येथे आढळतात. हे केंद्रीकरण योगायोग नसून व्यापार देवाण घेवाण आणि प्रवासी हालचालींशी निगडित असल्याचे ते सांगतात.
उत्खननात सापडलेल्या मोठ्या आकाराच्या साठवण भांड्यांनी संशोधकांचे विशेष लक्ष वेधले आहे. एका भांड्याची उंची सुमारे 1.25 मीटर असून त्या शेजारी विटांनी बांधलेल्या आणि खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या सापडल्या आहेत. एलिफंटा आणि व्यापारी समुदायातील संबंध आधुनिक काळातही दिसून येतो. शेतबंदर येथून गुहेकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या 1854 मध्ये ठाकर करमसी रणमल लोहाना यांनी बांधल्या होत्या. लोहाना समाज ऐतिहासिक दृष्ट्या सागरी व भू -व्यापारात सक्रिय असल्याने या वारशाची सलगता अधोरेखित होते.
डॉ. आंबेकर
उत्खननातील शोधामुळे प्रख्यात पुरातत्त्ववेता एस आर राव यांच्या मताला बळ मिळाले आहे. एलिफंटा बेट हे जहाजांच्या नांगर टाकण्याचे आणि माल हस्तांतरणाचे केंद्र होते. हा त्यांचा दावा आता अधिक ठोस पुराव्यासह समोर येत आहे.







