| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील प्रशासकीय भवनातील दोन मजली इमारतीमध्ये दिव्यांगांच्या सोयीसाठी कोणतीही स्वतंत्र्य व्यवस्था नाही. इमारतीत उद्वाहक अथवा सरकता जिना नसल्याची बाब सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सातत्याने केली जात होती. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी प्राधान्याने मांडली आणि आता प्रशासकीय इमारतीमध्ये उद्वाहक बसवण्यास निधीची तरतूद झाली आहे.
कर्जत तालुक्याचे प्रशासकीय भवन नव्याने बांधण्यात आले आहे. तेथे कर्जत तहसीलदार आणि कर्जत खालापूर या दोन तालुक्याचे प्रांत अधिकारी यांची कार्यालये आहेत. कर्जत येथील प्रशासकीय भवन ही तळमजला अधिक दोन मजली इमारत असल्याने वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, अपंग बांधव आणि गरोदर महिलांना जिने चढ-उतार करताना मोठी दमछाक होत होती. उद्वाहक नसल्याने अनेकांना कामासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमोघ कुळकर्णी यांनी दि.15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी लेखी पत्र देऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन देत उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर कुळकर्णी यांनी दिवाळीपूर्वी निधी मंजूर करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल देवांग यांनी माहिती दिली असून, प्रशासकीय भवनामध्ये उद्वाहक बसवण्यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच उद्वाहक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
प्रशासकीय भवनात उद्वाहक बसणार
