रिलायन्सविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

जेसीबीखाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

रिलायन्स नागोठणे इंडस्ट्रीज लिमिटेड संलग्न बेणसे सिद्धार्थनगरलगत नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाबाबत येथील स्थानिक भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. प्रकल्पाचे फायदे-तोटे याविषयी माहिती लपवली जात असल्याचा आरोप बेणसे झोतिरपाडा प्रकल्पबाधित संघर्ष समिती व ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वीची आयपीसीएल व आताची रिलायन्स यांच्याकडून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना मिळत असलेल्या वागणुकीचा पूर्व इतिहास पाहता वारंवार होणार्‍या अन्यायकारक धोरणामुळे येथील नव्या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असल्याची भावना स्थानिकांतून पुढे आली आहे. जेसीबीखाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच, असा आक्रमक पवित्रा आणि एल्गार बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी यांनी रिलायन्स नागोठणे कंपनीविरोधात केला आहे.

यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे म्हणाले की, नवीन प्रकल्प किती घातक आणि विनाशकारी आहे याची कोणतीही कल्पना स्थानिकांना दिलेली नाही. ज्या अर्थी येथील रिलायन्स वसाहत सुरक्षेच्या दृष्टीने इतरत्र हलवली आहे, त्या अर्थी या प्रकल्पाचे धोके जाणवत आहेत. तसेच बेणसे सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमी मानवी वस्तीत आणण्याचा घाट रिलायन्स व्यवस्थापनाने रचला असून, त्यास आमचा विरोध आहे. शेतकरी आणि स्थानिकांच्या मुळावर उठलेला हा प्रकल्प आम्ही कदापि होऊ देणार नाही, असा इशारा अडसुळे यांनी दिला आहे.

यावेळी दत्ता तरे म्हणाले की, बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो एकर जमीन या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होत आहे. शिवाय, अंबा नदीत सोडल्या जाणार्‍या रसायनमिश्रित सांडपाण्याने मच्छिमार, कोळी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे, तसेच पशुपालक शेतकरी संकटात आला आहे. कारण, येथील गुरचरण नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला आहे. माजी सरपंच स्मिता कुथे म्हणाल्या की, आयपीसीएल प्रकल्प ज्या अटी-शर्तीवर उभारला, त्या अटी पाळल्या गेल्या नाहीत, स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे नवीन प्रकल्पातून रोजगारनिर्मिती होईल याची शाश्‍वती नाही, म्हणून या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.

वरुणा तरे म्हणाल्या, रिलायन्स कंपनीने एमआयडीसीच्या कोणत्याही परवानग्या न घेता कंपनीच्या राखीव हरित पट्ट्यातील बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे व याअगोदरसुद्धा अशाच प्रकारे वृक्षतोड करून सदर झाडांची जाळून विलेव्हाट लावली आहे, रिलायन्स व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दीपिका तरे यांनी कोणत्याही प्रकल्पातून जल, वायू आणि भूप्रदूषण होत असते, या नवीन प्रकल्पातून पर्यावरणाचा र्‍हास, मानवी आरोग्यास अपाय, सजीव आणि जैवविधतेला धोका निर्माण होईल याची शाश्‍वती नाही, म्हणून या प्रकल्पाला विरोध आहे. सरिता पाटील म्हणाल्या की, नवीन येणार्‍या प्रकल्पाबाबत जनसुनावणी आयोजित करण्याबाबत सूचना केली. शेतकरी नीरा गोरे, विठाबाई माळी व सुनीता पाटील यांनी आमच्या शेतजमिनीला नव्या प्रकल्पापासून धोके असून, सुपीक जमीन नापीक होणार आहे, आमच्या शेतजमिनीचा योग्य निर्णय घ्या, मगच प्रकल्पाचा विचार करा, अन्यथा आम्हाला जेसीबीने चिरडले तरी मागे हटणार नाही, असा इशारा महिला शेतकर्‍यांनी आक्रमकपणे दिला आहे.

दरम्यान, यासंदर्भातील मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यावरणमंत्री, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, खा. सुनील तटकरे, खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार वर्षा गायकवाड, पालकमंत्री उदय सामंत, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आदींना सुपूर्द केले आहेत.

यावेळी उपस्थित संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, विजय एटम, दत्तात्रेय तरे, माजी सरपंच स्मिता कुथे, माजी सरपंच ज्योती तरे, माजी सरपंच सोनम पाटील, उज्ज्वला पाटील, समितीचे सचिव वरुणा तरे, नीरा गोरे, कल्पना अडसुळे, निनाद गोरे, ज्ञानेश्‍वर पाटील, दशरथ कुथे, रामचंद्र पाटील, राजेंद्र सुरावकर, मनोज कुथे, रमण पाटील, मोरेश्‍वर वारगे, सदानंद नाकते, संदीप कुथे, योगेश अडसुळे, राकेश जवके, एकनाथ घासे, काशीनाथ पाटील, सरिता पाटील, सुमन अडसुळे, सुषमा वारगे, सुषमा अडसुळे, निकिता मनोज कुथे, कलाश्री भोय, रेवती पाटील, दीपिका तरे, विठाबाई माळी आदींसह स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version