शरद पवार गटाचे आयुक्तांना निवेदन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आलेले आयुक्त मंगेश चितळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्यांनी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भेट घेतली. चितळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर देण्यात आल्याच. त्याचबरोबर त्यांच्यासमोर या भागातील समस्यांची तुतारी वाजवण्यात आली. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केली.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळपास आठ वर्षे होत आले आहेत. दोन वर्षांपूर्वी सिडको कडून महापालिकेने सेवा हस्तांतरित करून घेतले आहेत. मात्र, समस्यांच्या चक्रव्यूहामध्ये पनवेलकर विशेष करून सिडको वसाहतीतील रहिवासी अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता मनपा क्षेत्रातील नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. विशेष करून कळंबोली मध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाजूला पावसाळी गटारांचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने पावसाच्या पाण्याला निचरा होण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्याचबरोबर लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. पथदिवे काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. पनवेल मनपाने ठिकठिकाणी ई टॉयलेट उभारले आहेत, मात्र ते बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्यानांची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही. झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहे. याशिवाय राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अद्यापही पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी झालेली नाही. घनकचरा व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन दिसून येत नाही. त्याचबरोबर ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. घंटागाडी मध्ये माती भरून संबंधित ठेकेदार कचर्याचे वजन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाड्यांसाठी जागेचा पूर्णपणे अभाव आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. या परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीसुद्धा जीर्ण अवस्थेत आहेत. महापालिकेने या शाळा वर्ग करून घेतलेल्या नाहीत. याबाबत आयुक्त म्हणून आपण सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली.
रस्त्यांची दयनीय अवस्था पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये त्याची स्थिती दयनीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर खड्डे बुजून घेण्यात यावेत. त्याचबरोबर महानगर गॅससाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. तुषार पाटील यांनी केली.
क्रीडांगण आणि पार्किंगचा अभाव! महापालिका क्षेत्रामध्ये क्रीडांगणाचा अभाव आहे. सिडको कडून यासाठी आरक्षित असलेले भूखंड घेऊन मुलांना खेळण्यासाठी मैदान विकसित करण्यात यावेत. त्याचबरोबर वाहनांना सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुतर्फा वाहने उभे केले जातात. याबाबतही योग्य ते धोरण महापालिकेने ठरवावे अशी मागणी सुद्धा महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वैद्यकीय सुविधांचा वाणवा! पनवेल मनपाचे माता बाल संगोपन केंद्र रखडले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्यापही मार्गी लागलेला नाही. सिडको ने भूखंड न दिल्याने या केंद्राला विलंब लागला आहे. पनवेलकरांच्या दृष्टीने माता बाल संगोपन केंद्र अतिशय महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आयुक्तांनी लक्ष घालावे अशी विनंती निवेदनामध्ये करण्यात आली आहे.