शहापूर धेरंड येथे तटबंदी उभारणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड येथील सुमारे 5000 लोकवस्तीच्या गावाच्या सभोेवताली असलेल्या समुद्राच्या तटबंदीला ऑगस्ट 2021 मध्ये भगदाडे पडली आहेत. त्यामुळे कायम खारे पाणी शेतात व लोकवस्तीत येत होते. त्याचबरोबर 225 तलावामध्ये देखील खारे पाणी घुसून मासे मारण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यास अनुसरून अंधेरी यथे सहाय्यक उप मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मलिकनेर, यांच्या अध्यक्षतेखाली श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता खारभूमी काशिपुरे प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी पनवेल कार्यकारी अभियंता सावंत उपस्थित होते.


या बैठकीत ऐतिहासिक निर्णय झाले. मोठा पाडा शहापूर ता.अलिबाग येथील सुमारे 5 किमीचे संरक्षक बांध व तटबंदी व उघाडी यासाठी खारभूमीने बनवलेले अंदाजपत्रक एमआयडीसीनी स्वीकारले. 10 जून पर्यंत संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे या संपूर्ण प्रस्तावाचे सादरीकरण केले जाणार आहे. सुमारे 11 कोटी रु.चा खर्च करण्याची जबाबदारी एमआयडीसी ने स्वीकारली. येत्या पावसाळ्यात गावे बुडू नयेत म्हणून तातडीचे अंदाजपत्रक रु.80 लाख खर्च करायचे ठरवले त्यासाठी वेगळे अंदाजपत्रक खारभूमीने एमआयडीसीला सादर केले ते पूर्णता स्वीकारले. एमआयडीसीने 15 जून पर्यंत टेंडर करण्याचे मान्य केले. गावे वाचवण्यासाठी तातडीची बांध बंदिस्ती करण्याचे मान्य करण्यात आले आहे. यावेळी अमरनाथ भगत, विनायक पाटील, जयेश पाटील, प्रमोद पाटील, रेश्मा पाटील, वनिता पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version