। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील धेरंड शहापूर परिसरातील खाडीच्या बाजूला समुद्राचे खारे पाणी शेतीत येऊ नये म्हणून बांधलेले बंधारे आणि उघड्या या बांधण्यास प्रशासन चालढकल करत असून, समुद्राचे पाणी शेतीत येऊन शेती उद्ध्वस्त होत आहे आणि हे असेच राहिले तर ते पाणी गावागावात शिरून घरेच्या घरे पडून गावेच उद्ध्वस्त करून टाकण्याचा आणि ह्या हजारो एकर जमीन बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा कुटील डाव ही आगरी जनता जीवाची बाजी लावून परतवून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला.
मोठे शहापूर ता. अलिबाग येथील शेतकर्यांच्या मेळाव्यात डॉ. भारत पाटणकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले की, एकूणच या खारेपाटातील सर्व गावांना आणि शेतकर्यांना पर्यायाने आगरी समाजाला या सर्वच परिसरातून हद्दपार करून या ठिकाणी प्रदूषणकारी कारखाने उभे करण्याचा हा एक मोठा डाव आहे. त्यामुळेच हे बंधारे, उघाडी दुरुस्ती केल्या नाहीत तर, शेतीत पाणी येऊन शेती बाद होईल, गावात पाणी शिरले तर लोक कमी किंमतीत जमीन विकून परागंदा होतील, असे हे षडयंत्र असून जनता या त्यांच्या डावाला बळी पडणार नाही. त्यांचा हा डाव उधळून लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी राजन भगत, नंदन पाटील यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुनील नाईक यांनी केले. मेळावा संपल्यानंतर धेरंड येथील वाहून गेलेली बांध-बंदिस्ती व उघडी शेकडो स्त्री-पुरुष शेतकर्यांच्या सहभागाने डॉ. भारत पाटणकर यांनी पाहणी केली. यानंतर धेरंड गावाच्या स्मशानभूमीत तीव्र लढा करून जमीन व गावे वाचवण्यासाठी जीवाचे रान करण्याची शपथ घेण्यात आली.