। खोपोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील खोपोली आणि मोहपाडा नंतर मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले चौक गावाला संपूर्ण विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नगरपंचायत करण्यासाठी हालचाली सुरू असून प्रस्तावाला मूर्त रूप मिळाल्यास चौक परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाला खेटून असलेल्या चौक गावाची ऐतिहासिक ओळख आहे. सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ , रेल्वे स्थानक, नऊ किलोमीटर अंतरावर पाताळगंगा औद्योगिक वसाहत, मोरबा धरण आणि जमीनीची विपुलता यामुळे चौककडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. चौक ग्रामपंचायतीचे पाच वर्षापूर्वी विभाजन होऊन लोधिवली, आसरे,तुपागाव आणि चौक ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या. परंतु विभाजनानंतर देखील पायाभूत सुविधांची वानवा आहे.आसरे आणि तुपगाव ग्रामपंचायत अल्प महसुली उत्पन्न असून लोधिवली आणि चौक ग्रामपंचायत त्यामानाने अधिक संपन्न असल्या तरि विकासाला विशेष चालना मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा या ग्रामपंचायती एकत्र करून नगरपंचायत साठी प्रयत्न सुरू आहेत. चौक, आसरे, लोधिवली ग्रामपंचायतीमध्ये नगरपंचायत साठी ठराव मंजूर करण्यात आला. परंतु तुपगाव ग्रामपंचायतीमध्ये काही प्रमाणात विरोध झाल्याने नगरपंचायतीचे घोड अडल आहे. परंतु तुपगाव मधील काही ग्रामस्थांना नगरपंचायतीसाठी आग्रह आहे. चारही ग्रामपंचायतीची मुदत 3जानेवारी 2021मध्ये पूर्ण झाली असून कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूका होवू शकल्या नाही. त्यामुळे नगरपंचायतीची आलेली संधी चौक विकासासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे.विभाजनानंतर तुपगाव ग्रामपंचायतीची पाच वर्षे पूर्ण झाली असून चौकसह एकत्रित नगरपंचायत झाल्या मुलभूत सोयी सुविधा आणि विकासासाठी निधी अधिक मिळेल अशी अशा तुपगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव व्यक्त केली आहे.