| बारामती | वृत्तसंस्था |
महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन घटक पक्षांमधील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला आहे. या पक्षाने येथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. इंदापूर, दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. यापैकी इंदापूर तालुक्यातील भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पूर्वी नाराज होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी इंदापूरमध्ये घेतलेल्या सभेत हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) वासुदेव काळे यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. दौंडचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, बारामतीतील भाजप नेते चंद्रराव तावरे व सतीश काकडे प्रचारास सक्रिय झालेले नाहीत. दरम्यान, भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत महायुतीतील घटक पक्षांची बैठक घेतली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) माजी मंत्री विजय शिवतारे हेही अद्याप सक्रिय झालेले नाहीत. माजी खासदार व भाजप नेते प्रदीप रावत यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथप्रमुखांची समन्वय बैठक घेतली आहे. त्यामुळे खडकवासलातील अस्वस्थता काहीशी कमी झाली आहे.