आग लागली तेव्हा कर्मचारी चहा-नाश्ता करत होते

पोलीस तपासात उघड
। मुंबई । वृत्तसंस्था ।
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये काम करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचार्‍यांच्या अतिदुर्लक्षामुळे 6 नोव्हेंबर रोजी 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या आगीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तेव्हा त्यात असं आढळून आलं की, आग लागली तेव्हा आयसीयूमधले कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी गेलेले होते.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील मनोज पाटील यांनी सांगितलं की, आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये रुग्णालयाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. ते जवळच्या कॅन्टीनमध्ये चहा-नाश्ता करण्यासाठी गेले होते. रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी वेळीच मदत केली असती तर अनेकांचे जीव वाचवता आले असते. पोलिसांनी या प्रकरणी कलम 304 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू असून, पुरावे सापडल्यास आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या आहेत.

Exit mobile version