कृषी विभागाकडून प्रोत्साहन; ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
ग्रामीण भागातील महिला आपल्या घराच्या बाजूलाच परसबाग तयार करून त्यातून भाजीपाला लागवड करण्यावर भर देत आहेत. या लागवडीतून गावे, वाड्यांमधील महिलांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.
कोरोना काळात फावळ्या वेळेत काही तरी व्यवसाय सुरु करण्याची संकल्पना गावे, वाड्यांमधील महिलांनी मांडली होती. ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यास सुरुवात झाली. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग तयार करून भाजीपाला लागवड करण्याकडे महिला लक्ष देत आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाला लागवडीला महिलांनी सुरुवात केली. त्यामध्ये टोमॅटो, कोथींबीर, मिरची, कोबी, वांगी, फ्लावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड घराच्या बाजूला मोकळ्या जागेत अथवा शेतांवर करण्याचे काम महिला करित आहेत. या लागवडीतून महिलांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. स्थानिक बाजारात ही भाजी विक्रीसाठी नेऊन त्यातून उत्पन्नाचे साधन त्यांना मिळत आहे. त्यामुळे आज गावागावात परसबागेचा क्रेझ वाढत आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्याचबरोबर घराच्या बाजूला मोकळ्या जागेत अथवा शेतामध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून महिलांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांना वेगवेगळ्या भाज्यांचे बी देऊन शेतामध्ये लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम कृषी विभाग करू लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागाच्या उपक्रमालादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. परसबागेला कृषी विभागाकडून पुढाकार मिळत असल्याचे चित्र आहे.
महाजनेमध्ये पांढरा कांदा लागवडीचा प्रयोग
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे या परिसरात पांढर्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लाखो रुपयांची उलाढाल या लागवडीतून होते. पांढरा कांदा स्थानिकांसह पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे पांढरा कांदा लागवड आता अनेक गावांमध्ये करण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील शेतकरी सुभाष औचटकर या तरुण शेतकर्यानेखील पांढरा कांदा लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. काही क्षेत्रापर्यंत त्यांनी पांढर्या कांद्याची लागवड केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
परसबागेच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला मिळत आहे. घरच्या घरी वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करण्याची संधी मिळत आहे. या भाजी लागवडीतून रोजगार मिळत असताना घरीदेखील भाजी स्वयंपाकासाठी वापरली जात आहे.
महिला शेतकरी