| छत्तीसगड | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान आणि 12 माओवादी ठार झाले आहेत. या चकमकीबद्दल छत्तीसगड पोलिसांनी रविवारी सकाळी माहिती दिली.
उद्यानामध्ये एका भागात माओवाद्यांच्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडली. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत शहीद झालेले जवान डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क फोर्स चे होते. ज्यांचा माओवादविरोधी कारवायांमध्ये तज्ज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलामध्ये समावेश होता. दोन इतर जवान जखमी झाले असून त्यांना रायपूर येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता हेलिकॉप्टर पाठवण्यात येत असल्याचेही अधिकार्यांनी यावेळी सांगितले. इद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेली या वर्षातील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी येथे 12 जानेवारी रोजी तीन माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. अबुझमाडला लागून असलेले राष्ट्रीय उद्यानाचा हा भाग माओवाद्यांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. 2799.08 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. 1983 मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते. चालू वर्षात आतापर्यंत 62 माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे, तर छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी लढताना 11 जवानांनी देखील प्राण गमवावे लागले आहेत. तसेच या वर्षात बिजपूर येथील 5 जणांसह किमान 9 जणांची माओवाद्यांनी हत्या केली आहे.